नवी दिल्ली : भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याशी संबंधित साहित्य वाचायचे असेल किंवा संशोधन करायचे असेल तर ते पुढील वर्षीपासून डिजिटल स्वरूपात मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. त्यासंबंधीचे काम सध्या सुरू आहे. ‘द नेहरू आर्काइव्ह’ पुढील वर्षी १४ नोव्हेंबरला पंडित नेहरूंच्या जयंतीदिनी प्रत्यक्षात येईल. ‘जवाहरलाल नेहरू मेमोरियल फंड’ (जेएनएमएफ)ने बुधवारी याची घोषणा केली.
या उपक्रमात ‘द सिलेक्टेड वर्क्स ऑफ जवाहरलाल नेहरू’चे १०० खंड, १९४७ ते १९६४ मधील मुख्यमंत्र्यांना त्यांनी लिहिलेली पत्रे तसेच ‘लेटर्स फ्रॉम अ फादर टू हिज डॉटर’, ‘ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री’, ‘द युनिटी ऑफ इंडिया’, ‘द डिस्कव्हरी ऑफ इंडिया’, ‘ए बंच ऑफ ओल्ड लेटर्स’ यांसारखी प्रकाशित पुस्तके उपलब्ध होतील.
हेही वाचा >>> VIDEO: भरसभेत नितीश कुमार पाया पडायला गेले अन् नरेंद्र मोदींनी…; नेमकं काय घडलं?
हे डिजिटल आर्काइव्ह अमेरिकास्थित विल्सन सेंटरच्या धर्तीवर तयार करण्यात आले असून नेहरूंची १९१७ ते १९६४ मधील भाषणे, त्यांच्या समकालीनांनी केलेले लेखन, जागतिक अभिलेखातील त्यांच्यावरील साहित्य तसेच कमी प्रसिद्ध आणि अप्रकाशित लेखनाचाही यात समावेश असेल. यावर नेहरूंबद्दल माहिती अगदी सहजपणे उपलब्ध होईल तसेच डाऊनलोड करता येईल असे ‘जेएनएमएफ’चे विश्वस्त जयराम रमेश यांनी म्हटले आहे. तर नेहरूंच्या आधुनिक भारत आणि जगाच्या निर्मितीतील योगदानाची माहिती पुढील पिढ्यांना होणे आवश्यक असून त्यासाठी हे आर्काइव्ह मदत करेल असे संस्थेचे उपाध्यक्ष करण सिंग म्हणाले. ‘जेएनएमएफ’ची स्थापना १९६४ मध्ये ट्रस्टद्वारे झाली. त्यांनी ‘द सिलेक्टेड वर्क ऑफ जवाहरलाल नेहरू’चे प्रकाशन तसेच ‘जवाहरलाल नेहरू स्मृती व्याख्यान’ आयोजित केले जाते. दरवर्षी अभ्यासकांना जवाहरलाल नेहरू मेमोरियल फेलोशिप दिली जाते.