* चीनच्या पंतप्रधानांचे भारतीय उद्योजकांसमोर वक्तव्य
* भारताच्या दृष्टीने ‘नाजूक’ प्रश्नांवर तोडगा काढण्याची तयारी
सीमाप्रश्नासकट सर्वच कळीच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याची क्षमता आणि ‘हुशारी’ भारत आणि चीन या दोनही देशांमध्ये आहे असे सांगत भारताच्या दृष्टीने ‘नाजूक’ पण महत्त्वाचे असलेले प्रश्न आम्ही नक्कीच सोडवू, असा विश्वास चीनचे पंतप्रधान ली केक्वियांग यांनी व्यक्त केला. भारतीय उद्योजकांसमोर बोलताना ‘दूरच्या नातेवाईकांपेक्षा शेजार अधिक उपयुक्त’ असल्याचेही केक्वियांग यांनी सांगितले.
भारत आणि चीन या देशांनी प्रादेशिक तसेच जागतिक स्तरावर परस्परांच्या सहकार्याने काम करणे गरजेचे आहे, या मुद्दय़ावर भर देत चिनी पंतप्रधानांनी ‘शेजार महत्त्वाचा’ हे सूत्र अधोरेखित केले. उभय देशांमध्ये मतभेदाच्या मुदद्दय़ांपेक्षा मतैक्याचे मुद्दे अधिक असल्याचे सांगत सीमाप्रश्नासारख्या वादग्रस्त प्रश्नावर चर्चेद्वारे तोडगा काढण्याचे सामथ्र्य उभय देशांत आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चर्चेबद्दल समाधानी
भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी विविध मुद्दय़ांवर आपली चर्चा झाली असून या अत्यंत प्रांजळ, मोकळ्या आणि सुफळ चर्चेबद्दल आपण समाधानी आहोत असे केक्वियांग यांनी सांगितले. उभय देशांनी सर्व मुद्दय़ांवर चर्चा करण्याची तयारी दाखवली असल्याने आपल्याला बरे वाटले असे त्यांनी नमूद केले.
चीनचा ‘शेजार धर्म’
चीन आणि भारत हे अत्यंत नैसर्गिक ‘सहकारी’ आहेत, असे नमूद करीत आम्ही परस्परांकडे विकासाच्या अधिकाधिक संधी निर्माण करणारे सहकारी म्हणून पाहिले पाहिजे, असे आवाहन केक्वियांग यांनी केले. या भेटीचे फलित काय, असा प्रश्न विचारल्यास परस्परांबद्दल वाढलेला विश्वास आणि अनेक सकारात्मक बाबींबद्दल एकमत असे उत्तर देऊ असे चीनी पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
सीमाप्रश्नी भाष्य
हा विषय चर्चेदरम्यान अस्पर्शित राहिला नाही, उलट या प्रश्नावर चर्चेद्वारे तोडगा काढण्याची आमची दोघांचीही तयारी असल्याचे केक्वियांग यांनी सांगितले. उभय देशांनी वादग्रस्त मुद्दय़ांबाबत आपापली मते स्पष्टपणे व्यक्त केली तसेच परस्पर सामंजस्याने या प्रश्नावर तोडगा काढण्याची आमची तयारी असल्याचेही नमूद केले. सीमाप्रश्न सोडविण्यासाठी दोनही देशांनी कार्यक्षम सत्वर निर्णय घेणारी यंत्रणा उभारणे गरजेचे असल्याचे तसेच सीमावर्ती भागात शांततापूर्ण आणि सौहार्दतेचे वातावरण असणे गरजेचे असल्याची बाब अधोरेखित केली.

भूतकाळातील आठवणींना उजळा
भारतीय उद्योजकांसमोर भाषण करताना  केक्वियांग यांनी भाषणाची सुरुवात‘नमस्ते’ या शब्दांनी केली. आपण २७ वर्षांपूर्वी भारतात तरुण प्रतिनिधी म्हणून आलो होतो, त्या आठवणींना चीनच्या पंतप्रधानांनी उजाळा दिला. भारत आणि चीन जर ‘एका आवाजात’ बोलू लागले तर, जगाला त्यांचे म्हणणे ऐकणे भागच आहे, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.