मध्य प्रदेशमधील भोपाळमध्ये एका विचित्र प्रकरणामध्ये नवरा बायकोचं भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या शेजाऱ्याचीच हत्या झाली. येथील बिलखेरीया पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या चावणी पाथर गावामध्ये हा विचित्र प्रकार घडल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. हा संपूर्ण प्रकार तीन दिवसांनंतर उघडकीस आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना मंगळवारी घडली. मात्र या प्रकरणातील आरोपीला शुक्रवारी अटक करण्यात आली. पप्पू अहिरवार असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. भोपाळ ग्रामीणचे पोलीस अधीक्षक किरण लता करकेटा यांनी या प्रकरणासंदर्भातील माहिती दिली आहे. मंगळवारी आरोपी पती आणि त्याच्या पत्नीदरम्यान घरात चिकन बनवण्याच्या मुद्द्यावरुन जोरदार भांडण झालं. मंगळवारी घरी चिकन करणार नाही असं पत्नीचं म्हणणं होतं. याच मुद्द्यावरुन बराच वेळ वाद झाल्यानंतर पतीने पत्नीला मारहाण केली. घरातून येणार आवाज आणि गोंधळ यामुळे शेजाऱ्यांनी अहिरवार यांच्या घरी धाव घेतली आणि पती पत्नीमधील वाद सोडवला.
मात्र नंतर पप्पू एका शेजाऱ्याच्या घरी पोहोचला आणि त्याने शेजाऱ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. बबलू अहिरवार या शेजाऱ्याला पप्पूने काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये बबलूला गंभीर दुखापत झाली. बबलूला हमिदीया रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
घटनेच्या तीन दिवसांनंतर आरोपी पप्पूला अटक करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती पोलीस अधिक्षक करकेटा यांनी दिली.