नवी दिल्ली : भाजपचे विद्यामान राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना ‘रालोआ’ सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्यामुळे नव्या पक्षाध्यक्षाचा शोध सुरू झाला आहे. आतापर्यंत चर्चेत असलेल्या चार-पाच नेत्यांचा मंत्रिमडळात समावेश झाल्यामुळे सुनील बन्सल, विनोद तावडे, ओम माथूर, के. लक्ष्मण या चारही मोदी-शहांच्या विश्वासातील नेत्यांचा विचार केला जात असल्याचे समजते.

नड्डा यांना मंत्रिमंडळात घेतले गेले नसते तरी, त्यांच्या जागी नवा पक्षाध्यक्ष नियुक्त केला गेला असता. नड्डांची पक्षाध्यक्षपदाची मुदत ३० जून रोजी संपुष्टात येत आहे. नड्डांचा तीन वर्षांचा कालावधी संपल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. यंदाच्या निवडणुकीत भाजपने अपेक्षित कामगिरी न केल्यामुळेही पक्षाचे नेतृत्व मुरब्बी नेत्याकडे दिले जाणार असल्याचे स्पष्ट झाले होते.

लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने २०१९च्या विजयाची पुनरावृत्ती केली असती तर हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची पक्षाध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला गेला होता असे समजते. पण आता पक्षाध्यक्षपदाच्या निवडीमध्ये नवीन समीकरणांचा विचार केला जाणार आहे. शिवाय खट्टर यांना मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्रीपद बहाल करण्यात आले आहे. याशिवाय धर्मेद्र प्रधान, भूपेंद्र यादव, शिवराजसिंह चौहान यांनाही मंत्रीपद देण्यात आल्यामुळे पक्षाध्यक्षपदाच्या स्पर्धेतून हे नेतेही बाहेर पडले आहेत.

हेही वाचा >>> सध्याचे ‘मोदी सरकार’ लंगडे; राष्ट्रवादीच्या वर्धापनदिन सोहळ्यात शरद पवारांचे टीकास्त्र

रणनीती आखणीकार

पक्षाध्यक्षपदासाठी सुनील बन्सल यांचे नाव आघाडीवर असल्याचे मानले जाते. बन्सल यांनी उत्तर प्रदेशच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये रणनीतीच्या आखणीमध्ये अमित शहांसोबत काम केले आहे. संघाचे कार्यकर्ते असलेले बन्सल भाजप व संघ यांच्यातील दुवा बनू शकतात. प्रामुख्याने शहांचा बन्सल यांच्यावर विश्वास असल्यामुळेच भाजपसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पश्चिम बंगाल, तेलंगणा आणि ओडिशा या राज्यांचे प्रभारीपद त्यांच्याकडे देण्यात आले होते. ओडिशामध्ये भाजपने सत्ता काबीज केली असून तेलंगणामध्येही खासदारांच्या संख्येत भर पडली आहे. पश्चिम बंगालमध्येही तृणमूल काँग्रेसविरोधात भाजपने तगडी लढाई लढली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून विनोद तावडे यांचे दिल्लीतील राजकीय वजन वाढले असून मोदी-शहांनी त्यांच्याकडे अनेक संघटनात्मक जबाबदाऱ्या दिल्या आहेत. ‘प्रवासी लोकसभा’ या मोहिमेच्या समन्वयाची संपूर्ण जबाबदारी तावडेंनी सांभाळली होती. चंडीगड, हरियाणा आणि आता बिहार या राज्यांचे ते प्रभारी राहिले आहेत. राष्ट्रपती-उपराष्ट्रपती निवडणुकांमध्ये प्रचारमोहिमेचे तावडे सह-समन्वयक होते. इतर पक्षातील नेत्यांना प्रवेश देण्यापूर्वी होणाऱ्या छाननी समितीचेही ते प्रमुख आहेत. राष्ट्रीय महासचिव असलेले विनोद तावडे यांनी संघटनात्मक बांधणीमध्ये क्षमता सिद्ध केली असल्याने त्यांचाही पक्षाध्यक्ष पदासाठी विचार केला जाऊ शकतो.

संघटनात्मक बांधणीची क्षमता मोदींच्या विश्वासातील…

संघाचे प्रचारक राहिलेले ओम माथुर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये प्रभारी पद सांभाळले होते. माथुर मोदींच्या अत्यंत विश्वासातील मानले जातात. माथुर राजस्थानचे असून राज्यातील विधानसभा निवडणुकीत त्यांनी वसुंधरा राजे गटाशी समन्वय साधण्याची कामगिरी पार पाडल्याचे सांगितले जाते.