दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष आणि वर्णभेदाविरोधात काम करणारे नेते नेल्सन मंडेला (वय ९४) यांना फुप्फुसांचा आजार झाल्याने बुधवारी मध्यरात्री त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी देशवासीयांनी देवाकडे प्रार्थना करावी, असे आवाहन दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष  जेकब झूमा यांनी केले आहे. तीन महिन्यांपूर्वी मंडेला यांना १८ दिवसांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या वेळीही त्यांना फुप्फुसांचा संसर्ग झाला होता. या वेळी तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली होती. गेल्या चार महिन्यांत त्यांना तिसऱ्यांदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी  तज्ज्ञ डॉक्टरांना पाचारण करण्यात येईल, असे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.