दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष आणि वर्णभेदविरोधी लढ्याचे अग्रणी नेल्सन मंडेला (वय ९५) यांचे गुरूवारी मध्यरात्री निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. मंडेला यांना ‘मादिबा’ या नावानेही आफ्रिकेत ओळखले जाते. दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष जेकोब झुमा यांनी एक पत्रकार परिषद घेवून या घटनेची माहिती दिली. देशाने आपला महान असा पूत्र गमावला आहे अशी प्रतिक्रिया देत राष्ट्राध्यक्ष झुमा यांनी नेल्सन मंडेला यांना आदरांजली वाहिली. वर्णविद्वेषाविरुद्ध प्रखर लढा देणारे मंडेला यांच्या फुप्फुसांमध्ये संसर्ग झाल्याने त्यांना काही महिन्यापूर्वीच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि त्यांच्यावर आता घरी उपचार करण्यात येत होते.
फोटो गॅलरीः मंडेला यांना श्रद्धांजली..
सामाजिक समतेच्या मुल्यांसाठी त्यांनी आयुष्यभर दिलेल्या लढ्यामुळे मंडेला हे जगभरात वर्णभेदविरोधी संघर्षाचे प्रतिक म्हणून ओळखले जात. दक्षिण अफ्रिकेतील वर्णभेदी राजवटींविरुद्ध त्यांनी कडवा संघर्ष केला होता. या लढ्यामुळे त्यांना आपल्या आयुष्याची तब्बल २७ वर्षे तुरुंगात काढावी लागली. मात्र, या लढाईत अखेर त्यांचाच विजय झाला. त्यानंतर लोकशाही मार्गाने दे दक्षिण अफ्रिकेचे अध्यक्षही बनले. दक्षिण अफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष बनण्याचा मान त्यांना मिळाला.
‘लाँग वॉक फॉर फ्रीडम’ हे त्यांचं आत्मचरित्र जगभर गाजलं. त्याचे अनेक भाषांमध्ये अनुवादही प्रकाशित झाले. त्यांची छोटी-मोठी चरित्रंही आजवर प्रकाशित झाली . नेल्सन मंडेला यांनी विसाव्या शतकातल्या जवळपास सर्व महत्त्वाच्या उलथापालथी पाहिल्या. मंडेला यांची प्रकृती खालावली असताना त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे शेकडो समर्थक रुग्णालयाबाहेर जमलेले असायचे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा