वर्णविरोधात लढा देणारे ज्येष्ठ नेते नेल्सन मंडेला यांची प्रकृती अधिकच ढासळल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष जेकब झुमा यांनी आपला मोझाम्बिकचा दौरा गुरुवारी रद्द केला. झुमा यांनी बुधवारी रात्री रुग्णालयात जाऊन मंडेला यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला.
मोझाम्बिक येथे ‘साऊथ आफ्रिकन डेव्हलपमेण्ट कम्युनिटी’ची परिषद असून, त्या परिषदेत दक्षिण आफ्रिकेचाही महत्त्वाचा सहभाग आहे. असे असतानाही मंडेला यांच्या प्रकृतीच्या पाश्र्वभूमीवर झुमा यांनी तेथील दौरा रद्द केला आहे.
९४ वर्षांचे नेल्सन मंडेला यांच्या फुफ्फुसांना आजार झाला असून ८ जून रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रविवारपासून त्यांची प्रकृती ढासळतच आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. मंडेला यांना सध्या जीवरक्षक प्रणालीवर (व्हॅण्टिलेटर) ठेवण्यात आले आहे. गेल्या ४८ तासांत मंडेला यांची प्रकृती अधिकच बिघडल्याची माहिती झुमा यांचे प्रवक्ते मॅक महाराज यांनी सांगितले. मंडेला यांच्या प्रकृतीचे वर्तमान समजल्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हेही शनिवारी येथे येऊन मंडेला यांची विचारपूस करणार आहेत.