रुग्णशय्येवर खिळून असलेले दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपिता नेल्सन मंडेला यांचा ९५ वा वाढदिवस जगभरातील लोकांनी गुरुवारी उत्साहात साजरा केला. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनीही मंडेला यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, मंडेला हे फुफ्फुसाच्या संसर्गाने आजारी असले तरी त्यांची प्रकृती आता हळूहळू सुधारत आहे. मंडेला यांना ८ जून रोजी येथील रुग्णालयामध्ये उपचारार्थ हलविण्यात आले होते. मंडेला यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे शेकडो समर्थक रुग्णालयाबाहेर जमले होते. रुग्णालयाचे प्रवेशद्वार असलेल्या ‘सेलियर्स स्ट्रीट’जवळही मंडेला यांना शुभेच्छा देणारे फलक लावण्यात आले होते. देशभरातील शाळकरी मुलांनीही ‘हॅपी बर्थडे’ गाऊन आपल्या आवडत्या ‘मादिबा’च्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभीष्टचिंतन केले. मंडेला यांना मादिबा या नावानेही आफ्रिकेत ओळखले जाते.
दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष जेकब झुमा यांनीही रुग्णालयात जाऊन मंडेला यांना शुभेच्छा दिल्या. ते त्या ठिकाणी आल्यानंतर लष्करी दलाने बँडवर राष्ट्रगीत वाजविले. मादिबा हे रुग्णालयात उपचार घेत असले तरी त्यांची प्रकृती निश्चितपणे सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे, असे झुमा म्हणाले.
वर्णद्वेषाविरुद्घ सातत्याने लढा देणाऱ्या नेल्सन मंडेला यांनी आपल्या उमेदीची २७ वर्षे तुरुंगवासात घालविली आहेत. सामाजिक अन्यायाविरोधात लढणारा नेता म्हणून जगभरात त्यांचा मोठा आदर केला जातो. मंडेला यांना १९९३ मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. २००४ मध्ये त्यांनी सार्वजनिक जीवनातून निवृत्ती स्वीकारली. त्यानंतर ते कोणत्याही जाहीर कार्यक्रमास उपस्थित राहिले नाहीत. अपवाद होता, २०१० मध्ये झालेल्या जागतिक फुटबॉल स्पर्धेचा.
नेल्सन मंडेला यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दक्षिण आफ्रिकेने गुरुवारी नवीन स्मार्ट कार्ड जारी केले असून मंडेला हेच या कार्डाचे प्रथम मानकरी ठरले. मंडेला यांच्या वतीने त्यांच्या कन्या झिंडझी यांनी ते स्वीकारले.
दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा, ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांनीही मंडेला यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे हार्दिक अभीष्टचिंतन केले.