भूकंपाचा धक्का बसलेल्या नेपाळमध्ये सर्वत्र प्रचंड विध्वंस झालेला असतानाच बचावकर्त्यांनी गुरुवारी १५ वर्षांच्या एका मुलाला भूकंपानंतर पाच दिवसांनी आश्चर्यकारकरीत्या ढिगाऱ्याबाहेर काढले. यामुळे सार्वत्रिक दु:खाच्या वातावरणात एक आनंदाचा क्षण पाहायला मिळाला.
नुवाकोट येथील रहिवासी असलेला पेंबा लामा याला स्वयंसेवकांनी पाच तासांच्या बचाव मोहिमेनंतर धुळीने माखलेल्या आणि भांबावलेल्या अवस्थेत बाहेर काढण्यात येऊन एका रुग्णालयात हलवण्यात आले, तेव्हा येथे जमलेल्या गर्दीने जल्लोष केला. एका किशोराची आश्चर्यकारक सुटका होण्याचे हे ताजे उदाहरण आहे. भक्तपूर येथे चार महिन्यांच्या एका बाळाला ढिगाऱ्याखालून जिवंत काढण्यात आले होते. नेपाळच्या दुर्गम पहाडी भागात पोहोचण्यासाठी बचावकर्ते अजूनही धडपड करत आहेत. या ठिकाणी जोरदार पाऊस आणि भूस्खलन यामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण झाला आहे.