भारत व नेपाळमध्ये २५ एप्रिलला झालेल्या भूकंपानंतर मंगळवारी झालेल्या भूकंपात साखळी अभिक्रिया दिसून आली असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. जशी छाती फुगवल्यानंतर शर्टाची बटने एकापाठोपाठ एक निघत जातील तशीच भूगर्भातील ऊर्जा बाहेर येत आहे. एका ठिकाणचा ताण दुसऱ्या ठिकाणी नंतर तिसऱ्या ठिकाणी बाहेर येत आहे. त्यामुळे भूकंप होताना जमिनीला तडे जातात.
ब्रिटनच्या पोर्ट्स माउथ विद्यापीठातील ज्वालामुखी तज्ज्ञ श्रीमती कारमेन सोलाना यांनी सांगितले की, मोठे भूकंप होतात तेव्हा नंतर लहान धक्के बसत असतात. काही वेळा ते सुरुवातीच्या धक्क्य़ांइतके मोठे असू शकतात. त्यांनी सायन्स मीडिया सेंटर येथे सांगितले की, मंगळवारचा भूकंप हा श्रंखला अभिक्रियेसारखा होता. नेपाळची राजधानी काठमांडूपासून ७६ किलोमीटर अंतरावर झाला नंतर अध्र्या तासाने ६.३ रिश्टरचा दुसरा धक्का जाणवला. दोन्ही भूकंप एकाच प्रस्तरभंगात झालेले आहेत व ते ठिकाण भारतीय व युरेशियन प्लेट जिथे मिळतात तिथे आहे. ब्रिटनच्या मुक्त विद्यापीठाचे प्राध्यापक नायगेल हॅरिस यांनी सांगितले की, पहिला भूकंप हा एप्रिलमध्ये झाला नंतरचे धक्के आग्नेयेच्या दिशेने पसरत गेले. जी प्लेट पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकली त्यात अचानक तिला छेद गेला. मंगळवारचा भूकंप हा त्या प्रक्रियेचा परिणाम होता. २५ एप्रिल व १२ मे हे दोन्ही भूकंप फार खोलीवरचे नव्हते त्यामुळे ते जोरात जाणवले. पॅरिस येथील इन्स्टिटय़ूट फॉर प्लॅनेटरी फिजिक्स या संस्थेचे भूकंपशास्त्रज्ञ पास्कल बर्नार्ड यांच्या मते या भूकंपानंतरचे धक्के खरे तर पाच रिश्टरपेक्षा जास्त तीव्रतेचे नसायला पाहिजेत. ऐंशी वर्षांपूर्वी पूर्व नेपाळमध्ये १९३४ मध्ये ८.१ रिश्टरचा भूकंप झाला होता त्यात १०,७०० लोक मरण पावले होते. पास्कल यांनी सांगितले की,  दोन टेक्टॉनिक प्लेट्समधील दाब बराच हलका झाला आहे. भारतीय प्लेट दरवर्षी दोन सेंटिमीटरने वर येत आहे. ही प्रक्रिया सहज नसून त्यात घर्षण होत आहे व त्यामुळे घातक धक्के बसत आहेत. भारतीय व युरेशिया प्लेट्सच्या सीमेकडील भागात भूकंपाची तीव्रता जास्त आहे असे अमेरिकेच्या भूगर्भशास्त्रीय संस्थेने म्हटले आहे. २५ एप्रिलच्या अगोदर या टोकाकडच्या अडीचशे किलोमीटरच्या भागात सहा किंवा अधिक रिश्टरचे धक्के गेल्या संपूर्ण शतकात काही वेळा बसले आहेत.