नेपाळच्या दुर्गम डोंगराळ भागात शुक्रवारी (३ नोव्हेंबर) झालेल्या भूकंपात मोठी जीवित आणि वित्तहानी झाली आहे. या भूकंपात आतापर्यंत १५७ जण मृत्यूमुखी पडले आहेत. शुक्रवारी मध्यरात्री काठमांडूच्या पश्चिमेला ५०० किलोमीटरवर असलेल्या जाजरकोट जिल्ह्यात ६.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. भारताची राजधानी दिल्लीपर्यंत या भूकंपाचे धक्के जाणवले. दरम्यान, या भूकंपात वाचलेल्या एका तरुणीने भूकंपाच्या रात्री नेमकं काय घडलं? ती या संकटातून कशी बचावली याबाबतची माहिती दिली. तसेच या भूकंपात तिने तिच्या तीन बहिणी गमावल्याचंही सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जाजरकोट जिल्ह्यामधील खालंगा गावातल्या एका घरात चार बहिणी झोपल्या होत्या. या घरातली एक तरुणी या भूकंपातून वाचली. ईशा (२८) असं या तरुणीचं नाव असून तिने या भूकंपात तिच्या तीन बहिणी गमावल्या आहेत. मेरिना (२५) ऊर्जा (१७), उपासना (२३) अशी या तीन मुलींची नावं आहेत. भूकंपात त्यांच्या घराचं छत कोसळून तिघींचा मृत्यू झाला. ईशादेखील मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकली होती. बचाव पथकाने तिला ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं आणि नेपाळगंज येथील भेरी रुग्णालयात दाखल केलं. रविवारी दुपारी ती शुद्धीवर आली. ईशाच्या चेहऱ्याला आणि पाठीला गंभीर इजा झाली आहे.

शुद्धीवर आल्यानंतर ईशा म्हणाली, मला सगळं काही आठवत नाहीये. मला पुसटसं आठवतंय की आमच्या अंगावर छत कोसळलं. त्याच वेळी माझ्या बहिणी जिवाच्या आकांताने ओरडत होत्या. मी त्यांची हाक ऐकली. त्यानंतर अचानक सगळं शांत झालं. बहिणींचा आवाज येणं बंद झालं. तसेच माझी शुद्ध हरपली. शुद्धीवर आले तेव्हा मी रुग्णालयात होते. मला कधी आणि कोणी इथे आणलं ते आठवत नाही.

ईशा सध्या काठमांडू येथे महाविद्यालयात बीएचं शिक्षण घेत आहे. ईशा आणि मेरिना या घरातल्या दोन मोठ्या बहिणी त्यांच्या धाकट्या बहिणींना भेटण्यासाठी काठमांडूवरून ५०० किमी प्रवास करून जाजरकोटला आल्या होत्या.

हे ही वाचा >> Israel and Hamas War : गाझा पट्टीतील निर्वासित छावणीवर इस्रायलकडून पुन्हा हवाई हल्ला, ५० पॅलेस्टिनींचा मृत्यू

बारेकोटमध्ये घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, जीवितहानी नाही

या भूकंपामुळे नेपाळच्या जाजरकोट आणि रुकुम पश्चिम जिल्ह्यांत सर्वाधिक नुकसान झालं आहे. परंतु, जाजरकोटमध्ये एका पालिका क्षेत्रात मात्र या दुर्घटनेमुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ‘काठमांडू पोस्ट’ वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार बारेकोट ग्रामीण नगरपालिका हद्दीत घरे आणि सार्वजनिक पायाभूत सुविधांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे, परंतु सुदैवाने तेथे एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. या नगरपालिकेचे अध्यक्ष बीर बहादूर गिरी यांनी सांगितले, की जेव्हा येथील घरांचे झालेले नुकसान पाहिल्यानंतर येथे सुदैवाने कुणीही आपला जीव गमावला नाही यावर विश्वास ठेवणे कठीण जाते. ही देवभूमी आहे आणि देवानेच आपले रक्षण केल्याची अनेकांची श्रद्धा आहे. सुमारे साडेतीन हजार घरे असलेल्या या ग्रामीण भागात पाच जण जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. येथे भूकंपामुळे अजिबात नुकसान न झालेले घर क्वचितच असेल. किमान ९० टक्के घरे नव्याने बांधण्याचीच गरज आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nepal earthquake survivor isha recall moment of tragedy she lossed 3 sisters asc