खराब हवामानामुळे एव्हरेस्टवर अडकलेल्या १५ भारतीयांच्या एका समूहाने परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना ट्विटरवर मदत मागितली आहे. गेल्या ३ दिवसांपासून हे भारतीय एव्हरेस्टवर अडकले आहेत. खराब हवामानामुळे येथील सर्व विमान उड्डाणे रद्द झाली आहेत. त्यामुळे या लोकांना बाहेर येण्याचा मार्गच उरलेला नाही. ट्विट पाहिल्यानंतर सुषमा स्वराज यांनी नेपाळमधील भारताचे राजदूत मनजीवसिंग पुरी यांना याप्रकरणी लक्ष घालण्याची सूचना केली आहे.
Manjeev – Pls see this. @IndiaInNepal https://t.co/n36LJujmvW
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) May 26, 2018
अमित ठाढानी नावाच्या एका डॉक्टरने शनिवारी सुषमा स्वराज आणि विदेश मंत्रालयाला ट्विट करत आम्ही लुकला येथे मागील दोन दिवसांपासून अडकलो आहोत. तुम्ही आमची मदत करू शकता का? आम्ही सुमारे १५ भारतीय येथून सुरक्षित बाहेर पडण्याची वाट पाहत आहोत. स्थानिक दुतावासाबरोबर आम्ही संपर्क केला पण अजून काहीही होऊ शकलेले नाही, असे ठाढानी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.
Mission is in touch with your group. Flights from Lukla are cancelled due to bad weather. We are trying to get everyone evacuated by helicopter.
— IndiaInNepal (@IndiaInNepal) May 26, 2018
आम्ही काठमांडूतून लुकला जाण्यासाठी २०० डॉलर प्रती व्यक्ती प्रमाणे पैसे दिले होते, अशी माहितीही ठाढानी यांनी ट्विट करून सांगितले. सुषमा स्वराज यांच्या सूचनेनंतर सर्व भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे नेपाळमधील भारतीय दुतावासाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून सांगण्यात आले आहे.