हिमालयाच्या कुशीत वसलेल्या नेपाळवर शनिवारच्या भीषण भूकंपाने आपत्तीचा हिमालयच कोसळला. या भूकंपात १५०० नागरिक मृत्युमुखी पडले असून हजारो जखमी झाले आहेत. तब्बल ७.९ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा हा भूकंप सकाळी ११ वाजून ५६ मिनिटांनी झाला आणि दोन मिनिटांत त्याच्या तांडवात अनेक इमारती कोसळल्या तर रस्ते उखडले गेले. १६ भूकंपोत्तर धक्क्य़ांनीही नेपाळवर भीतीची छाया अधिकच गडद केली. भारतातही या भूकंपाने ५१ जण मृत्युमुखी पडले असून २३७ जखमी झाले आहेत.
पाचव्या शतकातील पशुपतीनाथाच्या मंदिराला कोणतीही हानी झाली नसल्याचे वृत्त असले तरी काठमांडूतील असंख्य वास्तू व इमारतींची मोठी हानी ओढवली आहे. रस्तेही उखडले गेले आहेत.
उत्तर, पूर्व व ईशान्य भारताला धक्का
नेपाळमधील भूकंपाने उत्तर, पूर्व तसेच ईशान्य भारतही हादरला असून तेथे ५१ जण ठार झाले आहेत. नेपाळला लागून असलेल्या बिहारमध्ये सर्वाधिक म्हणजे ३८ जण मृत्युमुखी पडले असून ४८ जखमी आहेत. उत्तर प्रदेशात ११ जण ठार झाले आहेत. पश्चिम बंगालमध्ये पालिका निवडणुका सुरू असतानाच झालेल्या या भूकंपाने प्रशासकीय यंत्रणेलाही जोरदार धक्का दिला असून दोनजण मृत्युमुखी पडले आहेत. पश्चिम बंगालच्या माल्डा जिल्ह्य़ात दोन शाळांत छत कोसळून ४० विद्यार्थी जखमी झाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा