गलवान खोऱ्यातील संघर्षामुळे भारत-चीन संबंध अत्यंत वाईट अवस्थेत असताना चीन आता वेगवेगळी आमिषं दाखवून बांगलादेशला आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करत आहे. भारताचे बांगलादेशबरोबर उत्तम संबंध आहेत. बांगलादेश हा भारताचा अत्यंत जवळचा विश्वासू सहकारी असलेला देश आहे. व्यापार आणि पैशाच्या बळावर शेजारी देशांना आपल्या बाजूला वळवून भारताची कोंडी करण्याची चीनची खेळी आहे.
लडाखमध्ये भारत-चीनचे सैन्य आमने-सामने उभे ठाकलेले असतानाच नेपाळने उत्तराखंडमधील भारतीय प्रदेशांवर दावा केला. त्यानंतर संविधानिक दुरुस्ती करुन कालापानी, लिम्पियाधुरा, लिपूलेख या भारतीया प्रदेशांचा आपल्या नकाशामध्ये समावेश केला. हा सर्व निव्वळ योगायोग नाहीय. यामागे चीन असल्याचे संकेत काही दिवसांपूर्वी भारतीय लष्करप्रमुखांनी दिले होते. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले. चीनच्या या आगळीकीली प्रत्युत्तर देण्यासाठी भारत वेगवेगळया पर्यायांवर विचार करत आहे. खासकरुन चीनच्या अर्थव्यवस्थेला धक्का देण्याचा प्रयत्न आहे. दरम्यान चीनने आता बांगलादेशला आमिष दाखवले आहे.
५१६१ वस्तुंच्या व्यापारावरील ९७ टक्के शुल्क माफ करण्याचा प्रस्ताव चीनने बांगलादेशला दिला आहे. अविकसित देश असल्यामुळे बांगलादेशने शुल्कामध्ये माफी मागितली होती आणि योगायोग म्हणजे गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर दुसऱ्याचदिवशी १६ जूनला चीनने बांगलादेशच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. येत्या एक जुलैपासून बांगलादेशला हा लाभ मिळणार आहे. या खेळीमागे बांगलादेशबरोबरील मैत्रीसंबंध अधिक दृढ करण्याची चीनची भूमिका आहे. शुल्कमाफीमुळे बांगलादेशचा आर्थिक लाभ होणार आहे.