Nepal PM Pushpa Kamal Dahal Prachanda : नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांना मोठा धक्का बसला आहे. कारण ते संसदेत विश्वासदर्शक ठराव हरले आहेत. १९ महिने पंतप्रधानपदावर राहिल्यानंतर आता त्यांना देशाचं प्रमुखपद सोडावं लागणार आहे. माजी पंतप्रधान के. पी. शर्मा यांच्या नेतृत्वाखालील सीएपीएन-यूएमएल पक्षाने प्रचंड यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. त्यानंतर शुक्रवारी (१२ जुलै) दुपारी नेपाळच्या संसदेत विश्वासमत चाचणी घेण्यात आली, ज्यामध्ये पुष्प कमल दहल प्रचंड यांचं सरकार पराभूत झालं आहे.
पुष्प कमल दहल यांच्या सरकारने संसदेत आतापर्यंत पाचव्यांदा विश्वासदर्शक ठरावाचा सामना केला आहे. यापूर्वी त्यांच्या विरोधकांनी चार वेळा विश्वासदर्शक ठराव मांडला होता. मात्र चारही वेळा ‘प्रचंड’ हे विश्वासदर्शक ठराव जिंकले होते. मात्र यावेळी दहल यांचं सरकार ज्या प्रमुख ‘टेकू’वर उभं होतं तो टेकू बाजूला झाल्यामुळे त्यांचं सरकार कोसळलं आहे. प्रचंड यांच्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओ) पक्षाने अनेक पक्षांना आपल्याबरोबर घेत देशात सरकार स्थापन केलं होतं. मात्र युतीमधील सीपीएन-यूएमएल या पक्षाने ३ जुलै रोजी सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे प्रचंड यांनी विश्वासदर्शक ठराव गमावला आहे.
पुष्प कमल दहल यांनी २५ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी पाच वेळा अविश्वास ठरावाचा सामना केला आहे. अखेर १९ महिन्यांनंतर त्यांचं सरकार कोसळलं आहे. ६९ वर्षीय प्रचंड यांना २७५ सदस्यीय प्रतिनिधी सभेत केवळ ६३ मतं मिळाली आहेत. अविश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने १९४ मतं पडली. विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी किमान १३८ मतं मिळवणं आवश्यक होतं.
पाच वेळा अविश्वास ठरावाचा सामना
पुष्प कमल दहल यांनी २५ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी पाच वेळा अविश्वास ठरावाचा सामना केला आहे. अखेर १९ महिन्यांनंतर त्यांचं सरकार कोसळलं आहे. ६९ वर्षीय प्रचंड यांना २७५ सदस्यीय प्रतिनिधी सभेत केवळ ६३ मतं मिळाली. अविश्वास ठरावाच्या बाजूने १९४ मतं पडली. विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी किमान १३८ मतं मिळवणं आवश्यक होतं.
नेपाळी काँग्रेस सरकार स्थापन करणार?
नेपाळच्या कनिष्ठ सभागृहातील सर्वात मोठा पक्ष नेपाळी काँग्रेसबरोबर वाटाघाटी केल्यानंतर के. पी. शर्मा ओली यांच्या पक्षाने म्हणजेच सीएपीएन-यूएमएलने सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. सीएपीएन-यूएमएलने प्रचंड यांच्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळशी युती तोडली आहे. त्यामुळे प्रचंड यांचं सरकार आता कोसळलं आहे. प्रचंड यांच्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळकडे (माओवादी सेंटर) केवळ ३२ सदस्य आहेत. तर सीएपीएन-यूएमएलकडे ७८ व नेपाळी काँग्रेसकडे ८९ सदस्य आहेत. त्यामुळे आता देशात नेपाळी काँग्रेस व सीएपीएन-यूएमएल हे दोन पक्ष मिळून सत्तास्थापन करतील. या दोन पक्षांकडे मिळून १६७ सदस्यांची ताकद आहे.
© IE Online Media Services (P) Ltd