भारत-नेपाळ सीमेवर मधेशी आंदोलकांवर कारवाई
भारत-नेपाळ सीमेवरील व्यापारी नाक्यांवर आंदोलन करणाऱ्या मधेशी निदर्शकांवर नेपाळी पोलिसांनी कठोर कारवाई केली असून यावेळी गोळीबारात एक भारतीय ठार झाला. आशिषराम असे त्याचे नाव असून तो बिहारचा आहे. बीरगुंज येथे मधेशी लोकांचे तंबू पोलिसांनी जाळून टाकले. त्यांना भारत-नेपाळ सीमेवरील मितेरी पुलावरून भल्या पहाटे केलेल्या कारवाईत हुसकावून लावले. त्यावेळी आधी लाठीमार करण्यात आला तर नंतर गोळीबाराचा मार्ग अवंलबण्यात आला, त्यामुळे बिरगुंज-रक्सौल व्यापारी नाके चाळीस दिवसांनंतर खुले झाले आहेत. या घटनेनंतर भारताने चिंता व्यक्त केली असून भारतीय वाहतूकदारांनी जीव धोक्यात घालू नये असे म्हटले आहे.
पहाटे साडेचार वाजता पोलिसांनी बिरगुंज-रक्सौल व्यापारी नाका खुला करताना पाच निदर्शकांना अटक केली. या नाक्यावरून भारत-नेपाळ यांच्या दरम्यान सत्तर टक्के व्यापार चालतो, असे गृहमंत्रालयाचे प्रवक्ते लक्ष्मीप्रसाद ढकाल यांनी सांगितले.
सुरक्षा अधिकाऱ्यांनी निदर्शकांवर लाठीमार केला, तेव्हा मधेशी निदर्शक त्यांच्या तंबूत झोपले होते. भारत-नेपाळ सीमेवर त्यांनी पुलावर तंबू ठोकले होते. त्यांचे तंबू व बिछाने पोलिसांनी जाळून टाकले. त्यानंतर १७९ रिकामे मालवाहू ट्रक भारतीय सीमेत आले व आवश्यक वस्तूंचा व्यापार आता सुरू होणार आहे. मधेशी आंदोलकांनी सीमेवरील व्यापार गेला महिनाभर अडवला असून नव्या राज्यघटनेत योग्य प्रतिनिधीत्व न मिळाल्याने त्यांनी आंदोलन सुरू केले होते. मधेशी हे भारतीय वंशाचे असून नेपाळच्या तराई भागात ते राहतात. त्यांनी रक्सॉल येथे व्यापारी नाके बंद केले होते. त्यामुळे नेपाळमध्ये इंधनाचा तुटवडा जाणवत होता. तीन डझन भारतीय ट्रकचालक नेपाळच्या बाजूने अडकून पडले होते व त्यांनी भारतात परत जाता यावे यासाठी बिरगुंज येथे भारतीय वकिलातीसमोर बैठा सत्याग्रह केला होता. नेपाळमध्ये जाण्यासाठी वाहनांच्या पंधरा किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या अशी माहिती ढकाल यांनी दिली. या वाहनांमध्ये इंधन, एलपी गॅस, औषधे व अन्न पदार्थ आहेत. भारतीय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे, की मधेशी लोकांनी नाकाबंदी केल्याने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करता आला नाही. दरम्यान, बिरगुंज येथे मधेशी गटांनी तुरळक निदर्शने केली. नेपाळकडे जाणारी वाहने सोडावीत असे आवाहन आम्ही भारतीय अधिकाऱ्यांना केले होते पण त्यांनी ते ऐकले नाही असा आरोप ढकाल यांनी केला आहे. आता रक्लॉल बिरगुंज हा व्यापारी नाका सुरू झाल्याने वाहनांना सुरक्षा देऊन जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नेपाळमध्ये सुरू होणार आहे असे त्यांनी सांगितले.

Story img Loader