Curfew In Many Areas Of Nepal Including Kathmandu : नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये शुक्रवारी (२८ मार्च) राजेशाही समर्थक व संरक्षण दलांमध्ये चकमकी झाल्या. राजधानीमधील अनेक भागांत तणाव निर्माण झाला आहे. परिणामी काठमांडूमधील तिनकुने, सिनामंगल व कोटेश्वर भागात कर्फ्यू लावण्यात आला आहे. नेपाळचं त्रिभूवन आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील रात्रभर बंद ठेवण्यात आलं होतं. नेपाळमध्ये चालू असलेल्या हिंसक आंदोलनात आतापर्यंत एका पत्रकारासह दोघांचा मृत्यू झाला आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार आंदोलकांनी सुरक्षेचं कडं तोडून पोलिसांवर दगडफेक केल्यामुळे पोलिसांनाही जमावावर लाठीहल्ला करावा लागला त्यानंतर हिंसाचार वाढला. अनेक ठिकाणी चालू असलेला हिंसाचार रोखण्यासाठी, जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. हिंसक जमावाने व्यापारी संकूल, शॉपिंग मॉल, राजकीय पक्षांची कार्यालये, मुख्यालय व प्रसारमाध्यमांची कार्यालये पेटवली.

राजेशाही समर्थक शुक्रवारी हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. त्यांनी प्रामुख्याने राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टी आणि इतर काही राजेशाही समर्थकांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं. आंदोलकांनी नेपाळचा राष्ट्रीय ध्वज आपल्या हाती घेतला होता. त्याचबरोबर त्यांच्याकडे नेपाळचे माजी शासक ज्ञानेंद्र शाह यांचे फोटो देखील होते. त्यांनी ठिकठिकाणी ज्ञानेंद्र शाह यांचे फोटो झळकावले. ‘राजा आओ, देश बचाओ’, ‘हमे राजशाही वापस चाहिये’, अशा घोषणा आंदोलक देत होते. देशभरातील तणाव पाहून सरकारने अनेक ठिकाणी सुरक्षा बलाच्या तुकड्या तैनात केल्या आहेत.

नेपाळमधील लाखो लोकांना पुन्हा एकदा राजेशाही हवी आहे

२००६ साली झालेल्या जनआंदोलनामुळे नेपाळमधील राजेशाही संपुष्टात आली आणि त्याजागी लोकशाही अस्तित्वात आली. त्याआधी २४० वर्षे नेपाळ हिंदूराष्ट्र म्हणून ओळखलं जात होतं. नेपाळ हे शेवटचं हिंदू राष्ट्र होतं असंही म्हटलं जातं. २००८ साली नेपाळ लोकतांत्रिक राष्ट्र बनलं. पण आता नेपाळच्या जनतेला पुन्हा एकदा राजेशाही हवी आहे.

ज्ञानेंद्र शाहांच्या व्हिडीओनंतर आंदोलन तीव्र झालं

अलीकडच्या काही महिन्यांमध्ये काही संघटना, गट पुन्हा एकदा देशात राजेशाही यावी यासाठी मागणी करू लागले आहेत, आंदोलनं करू लागले आहेत. नेपाळचे माजी शासक ज्ञानेंद्र शाह यांनी १९ फेब्रुवारी रोजी लोकशाही दिनानिमित्त एक व्हिडीओ संदेश जारी केला होता. त्यात त्यांनी म्हटलं होतं की जनतेने आता त्यांना पाठिंबा द्यावा. त्यानंतर त्यांचे समर्थक रस्त्यावर उतरण्यास सुरुवात झाली. ज्ञानेंद्र शाह यांचे समर्थक, राजेशाही समर्थक आता आंदोलनं करू लागले आहेत.

राजधानी काठमांडूत कर्फ्यू

राजधानी काठमांडूसह देशभरातील अनेक लहान मोठी शहरे व खेड्यांमधील परिस्थिती पाहता नेपाळच्या गृहमंत्रालयाने तणाव असलेल्या भागांमध्ये कर्फ्यू लावला आहे. शुक्रवारी नेपाळ महापालिकेच्या हद्दीत कर्फ्यू लावण्यात आला.