नेपाळ आणि उत्तर भारताला शनिवारी बसलेल्या भूकंपाच्या तीव्र धक्क्यामुळे मृतांच्या संखेमध्ये वाढ होवून ती नेपाळमध्ये १,१३० तर, भारतात ४७ वर पोहोचली आहे. राजधानी काठमांडूमध्ये भूकंपामुळे सर्वाधिक हानी झाली असून मृतांमध्येही येथील लोकांचा सर्वाधिक समावेश असल्याची माहिती गृह विभागाकडून देण्यात आली. सकाळी ११ वाजून ५६ मिनिटांनी याठिकाणी भूकंपाचा पहिला धक्का बसला, त्यानंतर बराच वेळ भूकंपानंतरचे आफ्टरशॉक्स जाणवत होते.
या शक्तीशाली भूकंपात नेपाळमधील अनेक इमारती आणि घरे जमीनदोस्त झाली आहेत. यामध्ये युनेस्कोन जागतिक हेरिटेजचा दर्जा दिलेल्या ऐतिहासिक दरहारा टॉवरचाही समावेश आहे. काठमांडूपासून उत्तर-पश्चिम दिशेला ८० किलोमीटर अंतरावर लामजुंग येथे या भूकंपाचे केंद्र होते. ७.९ रिश्टर स्केल इतक्या क्षमतेच्या या भूकंपाचा परिणाम भारत, पाकिस्तान आणि चीनमध्येदेखील पहायला मिळाला. प्रत्यक्षदर्शी आणि प्रसारमाध्यमांच्या माहितीनूसार याठिकाणी ३० सेकंद ते २ मिनिटे इतक्या अवधीचे अनेक भूकंपाचे अनेक धक्के बसले. तसेच भूकंपानंतरच्या आफ्टरशॉक्समुळेही या भागात मोठ्या प्रमाणात जीवीतहानी आणि वित्तहानी झाली. ८१ वर्षांनंतर प्रथमच नेपाळला इतक्या मोठ्या तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसल्याची माहिती, काठमांडूचे पोलीस उपमहानिरीक्षक कमल सिंग बाम यांनी दिली. नेपाळ आणि काठमांडू भागात सर्वाधिक नुकसान झाले असून या ठिकाणची अनेक घरे आणि इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. तसेच दळणवळण आणि संपर्क यंत्रणा ठप्प झाल्यामुळे मदतकार्यात अनेक अडथळे येत आहेत.
बेपत्ता व्यक्तींच्या शोधासाठी गूगलची मोहीम
नेपाळमधील भूकंपानंतर बेपत्ता नागरिकांच्या शोधासाठी गुगलनेही मदतीचा हात पुढे केला आहे. “पर्सनफाईंडर : २०१५ नेपाळ अर्थक्वेक” ही मोहीम गुगलने भारतीय सेनेच्या मदतीने सुरु केली आहे.
https://google.org/personfinder/2015-nepal-earthquake/
या लिंकवर क्लिक करुन बेपत्ता माणसांबाबत माहिती अपलोड करु शकता, त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीबाबत माहिती मिळाल्यास ती अपलोड करुन आप्तस्वकीयांपर्यंत पोहचवू शकता.