नेपाळमध्ये २५ एप्रिलला झालेल्या भूकंपानंतर तेथील पर्यटन व्यवसायाला १० अब्ज रुपयांचा फटका बसला आहे. नेपाळमध्ये पर्यटन हाच प्रमुख व्यवसाय असून दोन लाख पर्यटक या वर्षी नेपाळला भेट देण्याची अपेक्षा होती ती आता फोल ठरली आहे. नेपाळला जाणाऱ्या पर्यटकात भारतीयांची संख्या जास्त असते. हिमालयाच्या कुशीत वसलेल्या नेपाळला भूकंपाने हादरवून टाकले असले तरी नेपाळला आर्थिक आधार मिळावा म्हणून काही पर्यटकांनी तेथेच राहणे पसंत केले आहे. काहींनी तेथे स्वयंसेवकाची भूमिका पार पाडली आहे.
इस्रायलच्या पर्यटक शीर शालरे यांनी सांगितले की, नेपाळी लोकांचे आदरातिथ्य पाहून आपण येथेच काही काळ राहण्याचे ठरवले आहे. भूकंप झाला तेव्हा शालरे या पोखरा येथे होत्या नंतर त्यांनी त्यांच्या दूतावासाकडे धाव घेतली. तेथे त्यांना मिळालेल्या माहितीनुसार इस्रायलने वैद्यकीय उपचार छावण्या सुरू केल्या होत्या.
इस्रायलच्या आणखी एक पर्यटक हादर झाडोक यांनी सांगितले की, गरजेच्या वेळी नेपाळला मदत करणे गरजेचे आहे. आपण धडधाकट असताना संकटात सापडलेल्यांना मदत केली पाहिजे. नेपाळमध्ये १२५ क्रमांकावर आपत्कालीन वैद्यकीय सेवा उपलब्ध केली असून २०० जणांवर उपचार चालू आहेत.
पर्यटन क्षेत्राला मोठा धक्का बसला असून गेल्या चार महिन्यात दोन लाख आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी नेपाळची भेट रद्द केली आहे. पॅसिफिक आशिया ट्रॅव्हल असोसिएशनचे अध्यक्ष सुमन पांडे यांनी सांगितले की, नेपाळमध्ये ऑगस्टपर्यंत २.७५ लाख पर्यटक येणार होते. आता ही संख्या ७५ टक्क्य़ांनी कमी झाली आहे. अनेक पर्यटक भूकंपात मारले गेले. त्यात भारतातील लोकांची संख्या जास्त होती. अनेक प्राचीन वास्तू भूकंपाने जमीनदोस्त झाल्या आहेत. नेपाळमध्ये येणाऱ्या पर्यटकात २० टक्के भारतीय असतात. नेपाळमध्ये चीन, युरोप, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांचेही पर्यटक येतात. काठमांडूला चीन सीमेशी जोडणारा रस्ता बंद आहे असे सांगून पांडे म्हणाले की, देशाचा विमानतळही केवळ आपत्कालीन सामग्रीची ने-आण करण्यासाठी वापरला जात आहे.

नेपाळमधील पर्यटनाला फटका
* नेपाळमध्ये येणारे २० टक्के पर्यटक भारतीय.
* भूकंपात मरण पावलेले पर्यटक भारतीय.
* ऑगस्ट पर्यंतच्या पर्यटकात ७५ टक्के घट.
* पर्यटनाला २० अब्ज रुपयांचा फटका.