Odisha KIIT University: : ओडिशातील भुवनेश्वर येथील कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी (KIIT) मध्ये एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे भुवनेश्वर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. मृत विद्यार्थिनी ही नेपाळची रहिवासी असल्याची माहिती सांगितली जात आहे. प्रकृति लमसाल असं तिचं नाव असल्याचं सांगण्यात येत आहे. ती एका अभियांत्रिकी महाविद्यालयात बी.टेकच्या तृतीय वर्षात शिकत होती. ही घटना उघडकीस आल्यानंतर कॅम्पसमधील विद्यार्थ्यांमध्ये तणावाचं वातावरण पसरलं आहे.
कॉलेजच्या रजिस्ट्रारने या घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, ती मुलगी बी.टेकच्या तृतीय वर्षात होती. या विद्यार्थिनीने तिच्या वसतिगृहात रविवारी आत्महत्या केली, ती नेपाळची रहिवाशी आहे. या विद्यार्थिनीचे एका विद्यार्थ्यासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय आहे. त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला आणि तिने हे पाऊल उचललं असावं असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. याबाबत मृत विद्यार्थ्याच्या पालकांना माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये काहीसा तणाव निर्माण झाला होता. मात्र, कॅम्पसमध्ये ६० पेक्षा जास्त पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला असून सध्या कॅम्पसमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. काही विद्यार्थ्यांनी या घटनेवरून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पण कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
या विद्यार्थिनीने वसतिगृहातील ज्या खोलीत आत्महत्या केली तो परिसर पोलिसांनी सील केला आहे. तसेच तिचे पालक येईपर्यंत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. मृत विद्यार्थिनीचा मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर गॅजेट्स जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणाची वैज्ञानिक आणि फॉरेन्सिक तपासणी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, प्रथमदर्शनी तपासात तिने आत्महत्या केली असल्याचं दिसून येत आहे. या घटनेसंदर्भात तिच्या एका बॅचमेटला ताब्यात घेण्यात आलं असून चौकशी सुरु आहे. तसेच आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.