देशभरात मॅगी इन्स्टंट नूडल्सवर घातलेली बंदी उठवण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उत्पादक नेस्ले इंडिया कंपनीने स्वागत केले असून, ‘मॅगी’ची नव्याने चाचणी करण्याच्या आदेशाचे पालन केले जाईल असे म्हटले आहे.
फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अ‍ॅथॉरिटी ऑफ  इंडिया (एफएसएसआय) आणि अन्न व औषध प्रशासनाने घातलेली बंदी उठवण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. आमच्या उत्पादनांची नव्याने चाचणी करावी या आदेशाचे संपूर्ण पालन केले जाईल, असे कंपनीने एका निवेदनात सांगितले. एफएसएसआय, एफडीए व इतर संबंधितांच्या बरोबरीने काम करण्यास आम्ही बांधील असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे.
तथापि, मॅगी इन्स्टंट नूडल्सचे उत्पादन आणि विक्री किती लवकर सुरू केली जाईल, याबाबत कंपनीने काहीही सांगितलेले नाही. ‘मॅगी’ नूडल्सचे उत्पादन आणि विक्री काही अटींच्या अधीन राहणार असून, न्यायालयीन आदेशाची प्रत मिळाल्यानंतर त्याबाबत माहिती दिली जाईल’, असे नेस्ले इंडियाने म्हटले आहे.