दोन मिनिटांत झटपट तयार होणाऱया ‘नेस्ले’च्या ‘मॅगी’ नूडल्सचे दिवाळीच्या मुहूर्तावर पुनरागमन होणार आहे. मॅगीवरील बंदी उठवल्यानंतर नेस्ले कंपनीने भारतातील तीन प्रकल्पांत उत्पादन सुरू केले आहे. या उत्पादनांची सुरूवातीला अन्न परिक्षण प्रयोगशाळांमध्ये तपासणी होईल आणि मंजुरी मिळाल्यानंतर पुढील महिन्यापासून मॅगी बाजारात विक्रीसाठी आणण्यात येईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. कर्नाटकातील नानजनगुड, पंजाबमधील मोगा आणि गोवा येथील बिचोलिम येथील प्रकल्पांमध्ये मॅगीचे उत्पादन सुरू करण्यात आल्याचे, नेस्ले कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलेल्या तीनही प्रयोगशाळात केलेल्या चाचण्यात मॅगी नूडल्स ‘पास’ झाल्याने मॅगीच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा झाला आहे. मॅगी नूडल्सच्या नमुन्यांचे परीक्षण नवीन उत्पादनाबाबतीत मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलेल्या तीन प्रयोगशाळांत केले असता त्यात शिसे व मोनोसोडियम ग्लुटामेट धोकादायक प्रमाणापेक्षा कमी दिसून आल्याचे कंपनीने याआधी जाहीर केले आहे. मॅगी नूडल्स सुरक्षित आहेत त्यांच्या २० कोटी पाकिटांच्या चाचण्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रयोगशाळात केल्या आहेत व त्यात कुठल्याही रसायनाचे धोकादायक प्रमाण दिसलेले नाही, असेही कंपनीने स्पष्ट केले होते.

Story img Loader