पीटीआय, कोलकाता
‘‘नेताजी सुभाषचंद्र बोस व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भारतास महान राष्ट्र बनवण्याचे एकच ध्येय होते,’’ असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी सोमवारी येथे व्यक्त केले. संघ आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची विचारधारा एक नव्हती, यावरून टीका होत असताना भागवत यांनी हे वक्तव्य केले.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहताना स्वातंत्र्यलढय़ातील नेताजींच्या योगदानाची भागवत यांनी प्रशंसा केली. प्रत्येकाने नेताजींचे गुण आणि शिकवण आत्मसात करून देशास ‘विश्व गुरू’ बनवण्याच्या दिशेने प्रयत्न करण्याचे आवाहन भागवत यांनी यावेळी केले.
भागवत म्हणाले, की आम्ही नेताजींच्या स्वातंत्र्य चळवळीतील अमूल्य योगदानाबद्दल कृतज्ञ असल्यामुळेच नव्हे तर त्यांचे गुण आत्मसात करण्यासाठी त्यांचे स्मरण करतो. भारताला महान बनवण्याचे त्यांचे स्वप्न अजूनही पूर्ण झालेले नाही. ते साध्य करण्यासाठी आपल्याला काम करावे लागेल. परिस्थिती आणि मार्ग भिन्न असू शकतात. परंतु एकच ध्येय गाठायचे आहे.
सुभाषबाबू पूर्वी काँग्रेसशी संबंधित होते. त्यांनी सत्याग्रह व आंदोलनाचा मार्ग अवलंबला. परंतु जेव्हा त्यांना हे लक्षात आले की हे पुरेसे नाही व स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढा देण्याची गरज आहे, तेव्हा त्यांनी तो मार्ग अवलंबला. मार्ग वेगवेगळे आहेत पण ध्येय एकच आहे. सुभाषबाबूंचे अनुकरणीय आदर्श आपल्यासमोर आहेत. त्यांचे अन् आमचे ध्येय एकच आहे. नेताजींनी म्हंटले होते, की भारताने जगासाठी काम केले पाहिजे आणि हे ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला काम करावे लागेल.
संघाच्या टीकाकारांच्या मते नेताजींची धर्मनिरपेक्षतेवर श्रद्धा होती. संघाच्या हिंदूत्ववादी विचारसरणीविरुद्ध नेताजींची विचारसरणी होती.नेताजींच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्न : मोदीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ‘ट्वीट’द्वारे नमूद केले, की आज पराक्रम दिनानिमित्त मी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली वाहतो व त्यांच्या अद्वितीय ऐतिहासिक योगदानाचे स्मरण करतो. वसाहतवादी परकीय राजवटीला कडवा विरोध केल्यामुळे ते स्मरणात राहतील. त्यांच्यामुळे प्रेरित होऊन आम्ही त्यांचे भारताचे स्वप्न साकारण्यासाठी काम करत आहोत.
नेताजींच्या अतुलनीय धैर्यास वंदन : शहा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. ब्रिटिशांशी लढताना नेताजींना दाखवलेल्या अतुलनीय धैर्याला वंदन केले. शाह यांनी ‘ट्वीट’ केले की आपल्या अद्वितीय नेतृत्व क्षमतेने नेताजींनी लोकांना संघटित केले. ‘आझाद हिंदू फौज’ स्थापन करून भारताच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र आंदोलन केले. त्यांच्या धैर्याला आणि संघर्षांला संपूर्ण देश प्रणाम करतो.