Netherlands PM Mark Rutte : आपल्या देशात बहुसंख्य नेते हे कोट्यधीश आहेत. महापालिकेतील नगरसेवकही एसयूव्हीमधून फिरतात. मात्र एखाद्या देशाचा पंतप्रधान सायकलवर बसून कार्यालयातून घरी जाताना दिसला तर लोकांना आश्चर्याचा धक्का बसू शकतो. असाच एक प्रसंग नेदरलँड्सच्या नागरिकांना याची देही, याची डोळा पाहण्याची संधी मिळाली. सलग १४ वर्षे नेदरलँड्सचा पंतप्रधानपदी असलेले मार्क रुटे यांनी नुकताच त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. सत्तेचं हस्तांतरण केलं आणि त्यांच्या सायकलवर बसून घरी निघून गेले. अनेक देशांमध्ये, राज्यांमध्ये सत्तेचं हस्तांतरण करताना मोठे सोहळे केले जातात. मात्र आजवर साधेपणाने जगत आलेले मार्क रुटे यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा शेवटही तितकाच साधेपणाने केला.
मार्क रुटे शनिवारी (६ जुलै) शासकीय कारऐवजी सायकलवरून त्यांच्या हेग येथील कार्यालयात (पंतप्रधान कार्यालय) दाखल झाले. राजीनामा दिल्यानंतर व सत्तेच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पार पडल्यानंतर ते त्याच सायकलवर बसून घरी परतले.
मार्क रुटे यांचा पंतप्रधान कार्यालयातून बाहेर पडून सायकलवर बसून घरी जातानाचा व्हिडीओ प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्याने टिपला असून हा व्हिडीओ जगभर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दिसतंय की, मार्क रुटे नेदरलँड्सचे नवनिर्वाचित पंतप्रधान डिक शूफ यांच्याकडे काही चाव्या सोपवत आहेत. त्यानंतर दोन्ही नेते काही वेळ चर्चा करतात आणि संयुक्त पत्रकार परिषदेला सामोरे जातात. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधल्यानंतर रुटे आणि शूफ कार्यालयाच्या बाहेर येतात. कार्यालच्या दरवाजाबाहेर दोघेही हस्तांदोलन करतात आणि एकमेकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतात.
या कार्यालयाच्या बाहेर एक सायकल उभी असल्याचं दिसत आहे. मार्क रुटे शूफ यांच्याशी बोलून झाल्यानंतर सायकलजवळ जातात. त्या सायकलचं कुलूप उघडतात आणि त्या सायकलवर स्वार होऊन निघून जातात. घरी जात असताना ते मागे वळून त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना, चाहत्यांना आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंना एकदा अभिवादनही करतात.
हे ही वाचा >> “राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवारीपासून केवळ परमेश्वर मला थांबवू शकतो, आणि तो..”, जो बायडेन यांचं वक्तव्य
मार्क रुटे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता डिक शूफ हे नेदरलँड्सचे नवे पंतप्रधान झाले आहेत. शूफ हे यापूर्वी नेदरलँड्सच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख होते. किंग विलियम-अलेक्झांडर यांच्या उपस्थितीत शूफ यांनी पंतप्रधान कार्यालयाचा कार्यभार स्वीकारला. नेदरलँड्सच्या गुप्तचर संस्थेत काम करत असताना शूफ यांनी अनेक यशस्वी दहशतवादविरोधी मोहिमा पार पाडल्या आहेत. शूफ यांची नेदरलँड्सच्या पंतप्रधानपदी झालेली नियुक्ती अनेकांना आश्चर्याचा धक्का देणारी ठरली आहे.