वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नेदरलँडमध्ये कठोर निर्बंध लादण्यात आलेत. मात्र, याविरोधात तेथे आंदोलन सुरू झालं. आंदोलनात घुसलेल्या काही समाजकंटकांनी दुकानांची तोडफोड, दगडफेक, आग लावणे आणि पोलिसांवर हल्ला केला. यानंतर पोलिसांनी आक्रमक आंदोलकांवर गोळीबार केलाय. आंदोलकांची हिंसा आणि पोलिसांचा गोळीबार यात अनेकजण जखमी झालेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “दोन दंगलखोरांना गोळी लागल्यानं त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तसेच त्यांच्यावर पोलिसांनी की इतर कुणी गोळी झाडली याचा तपास सुरू करण्यात आलाय.” या जखमींच्या तब्येतीबाबत कोणतीही माहिती पोलिसांनी दिलेली नाही. दरम्यान, पोलिसांनी दंगल केल्याच्या आरोपाखाली जवळपास ५१ जणांना अटक केलीय. यातील निम्मे आरोपी अल्पवयीन आहेत.
नेमकं काय घडलं?
शनिवारी (२० नोव्हेंबर) दुपारी एका पोलीस अधिकाऱ्याला दंगलीत जखमी झाल्यानं रुग्णालयात दाखल करावं लागलं. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. इतर एका पोलीस कर्मचाऱ्यावर रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांनी उपचार केले. तर असंख्य पोलिसांना किरकोळ जखमा झाल्या. यानंतर पोलिसांनी आंदोलकांविरोधात कठोर कारवाई सुरू केली. यावेळी हिंसक आंदोलकांनी पोलिसांवरच दगडफेक करत हल्ले सुरू केले. तसेच फटाक्यांचा वापर करूनही हल्ले करण्यात आले. यानंतर पोलिसांनी गोळीबार केला. सुरक्षा कॅमेरांच्या व्हिडीओ फुटेजचा उपयोग करून आरोपींचा शोध घेतला जात आहे आणि अटकसत्र सुरू करण्यात आलंय.
महापौरांकडून हिंसाचाराचा निषेध
हिंसाचार घडला त्या रोटरडॅम शहराचे महापौर अहमद अबौतालेब यांनी या हिंसाचाराचा निषेध केलाय. ते म्हणाले, “शनिवारी पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी शस्त्रास्त्रांचा वापर केलाय. आंदोलकांनी मॉलची नासधुस केली. शहरात तोडफोड करत पोलिसांवरही हल्ले केले. यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला. जखमींबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.”
समोर आलेल्या फोटोंमध्ये हिंसक आंदोलकांनी पोलिसांची कारही पेटवलेले दिसत आहे. तसेच अन्य एका पोलीस कारची तोडफोड केलेली पाहायला मिळतेय. मध्यरात्रीनंतर दंगलविरोधी पथक आणि पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्याचीही माहिती मिळत आहे.