परस्पर संमतीने ठेवल्या जाणाऱ्या समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणाऱ्या कलम ३७७च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुप्रीम कोर्टाने अतिशय महत्त्वाचा निर्णय दिला. दोन सज्ञान समलैंगिकांनी ठेवलेले संबंध ही पूर्णपणे खासगी बाब असून, तो गुन्हा ठरत नाही असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. या निर्णयानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनीच त्याचं स्वागत करत आपला आनंद व्यक्त केला.

समलैंगिकांच्या हक्कांसाठी झटणाऱ्या कार्यरर्त्यांसह कलाविश्वातूनही अनेकांनीच या निर्णयाचं स्वागत केलं आहे. निर्माता- दिग्दर्शक करण जोहरने या निर्णयातं स्वागत करत ट्विटर अकाऊंटवरुन एक फोटो पोस्ट केला. त्यासोबत करणने लिहिलं, ‘हा एक ऐतिहासिक निर्णय ठरला आहे. आज मला खुप अभिमान वाटतोय. हा माणुसकीचा आणि समान हक्कांचा विजय आहे. आज देश पुन्हा खऱ्या अर्थाने जगू लागला असं म्हणावं लागेल.’ त्यासोबतच अभिनेत्री स्वरा भास्करनेही या निर्णयाविषयी एक ट्विट केलं आहे.

प्रगतीपथावर असणाऱ्या आपल्या देशाच्या दृष्टीने आज एक नवा प्रकाशझोतच पाहायला मिळाला, असं म्हणत अभिनेता आयुषमान खुरानाने त्याची प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. तर, आजचा दिवस हा भारतासाठी, भारतीयांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस ठरल्याच्या प्रतिक्रिया लेखक चेतन भगत, अभिनेता अर्जुन कपूर आणि इतरही बऱ्याच मंडळींनी दिली आहे.

वाचा : #Section377 : ‘स्वच्छंदपणे आणि सर्वांसमोर प्रेम करण्याचं स्वातंत्र्य हवंय’

काय होता नेमका वाद?
समलैंगिकांच्या हक्कांसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांसह इतरांनी केलेल्या याचिकांची सुनावणी केल्यानंतर सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांच्या घटनापीठाने गेल्या १७ ऑगस्टला निकाल राखून ठेवला होता. युक्तिवादादरम्यान केंद्र सरकारने दोन प्रौढांनी परस्परसंमतीने केलेल्या अनैसर्गिक संभोगाला गुन्हा ठरवण्याशी संबंधित दंडात्मक तरतुदींच्या घटनात्मक वैधतेचा मुद्दा न्यायालयाच्या सदसद्विवेकबुद्धीवर सोडला होता. अल्पवयीन मुले आणि प्राणी यांच्याशी अनैसर्गिक संभोगाबाबतच्या दंडात्मक तरतुदींचे इतर पैलू कायद्यात तसेच कायम राहू दिले जावेत, अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली होती.