पाकिस्तानने यापुढे सैनिकांचा शिरच्छेद करण्यासारखी आगळीक पुन्हा केल्यास त्यांना सडेतोड, तीव्र व तत्काळ प्रत्युत्तर दिले जाईल असा खणखणीत इशारा नवे लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंग सुहाग यांनी दिला.
लष्करप्रमुख म्हणून त्यांचे स्वागत झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले, की यापूर्वी पाकिस्तानने भारतीय सैनिकांचा शिरच्छेद केल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा घटना पुन्हा घडल्यास त्याला त्यापेक्षा सडेतोड, तत्पर व तीव्र असे उत्तर दिले जाईल यात शंका नाही. आधीचे लष्करप्रमुख जनरल बिक्रमसिंग यांनी असे सांगितले होते, की लान्स नायक हेमराज यांचा ८ जानेवारीला प्रत्यक्ष ताबारेषेवर शिरच्छेद झाल्यानंतर त्याबाबत पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यात आले होते. बळाचा वापर हा केवळ सैन्यदलांच्या माध्यमातूनच होतो असे नाहीतर डावपेचात्मक काही भाग असतो.
पाकिस्तानी सैन्यदलांनी सीमा भाग पथकाच्या माध्यमातून लान्स नायक हेमराज यांचा शिरच्छेद केला होता व लान्स नायक सुधाकर सिंग यांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न केला होता. त्यानंतर ऑगस्टमध्ये त्यांनी पाच भारतीय जवानांना ठार केले होते. त्यात लष्कर ए तोयबाचे अतिरेकी व पाकिस्तानी लष्कर यांनी संयुक्त मोहीम राबवली होती.
जनरल सुहाग यांनी आपल्यावर विश्वास दाखवल्याबद्दल सरकारचे आभार मानले. भाजपने यापूर्वी सुहाग यांच्या लष्करप्रमुखपदी नियुक्तीला मे महिन्यात विरोध केला होता. भारतीय लष्कराचा प्रभाव वाढवणे व सज्जता वाढवणे, लष्कराचे आधुनिकीकरण, पायाभूत सुविधांचा विकास, मनुष्यबळ वाढवणे, सैनिकांचे कल्याण व माजी सैनिकांचे प्रश्न याला आपण प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.