तेलंगणाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुरात नवविवाहित वधूसह तब्बल सात जण वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विकाराबादमध्ये, नवविवाहित प्रवालिका आणि नवाज रेड्डी हे लग्नानंतरच्या कार्यक्रमातून परतत असताना इतर चार जणांसह कारमधून प्रवास करत होते. तेव्हा नवीन वधू, तिची मेहुणी श्वेता आणि तिचा मुलगा ८ वर्षीय त्रिनाथ रेड्डी हे वाहून गेल्याची घटना घडली. हा मुलगा अद्याप सापडलेला नाही.
मुसळधार पावसानंतर रविवारी (२९ ऑगस्ट) रात्री वारंगलमधील एका नाल्यात एका सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृतदेह तरंगताना आढळला. शिवानगर येथील वोर्रम क्रांती कुमार अशी त्याची ओळख पटली आहे. यावेळी एक लॅपटॉप देखील सापडला आहे. शंकरपल्लीमध्ये आणखी एका ७० वर्षीय वृद्ध वाहनातून वाहून गेल्याचं वृत्त आलं. तर आदिलाबादमध्ये ३० वर्षीय मजूरही वाहून गेला. त्याचप्रमाणे, यदाद्री भोंगीर जिल्ह्यात स्कूटरवर बसलेल्या दोन लहान मुलीही वाहून गेल्याचं देखील वृत्त आलं आहे.
बसमधील १२ प्रवाशांची सुटका
राजन्ना-सिरसिल्ला जिल्ह्यात वाहत्या पाण्यात वाहन अडकल्यानंतर राज्य परिवहनाच्या बसमधील १२ प्रवाशांची सुटका करण्यात आली. दक्षिण पश्चिम मान्सूनमुळे विकाराबाद, रंगा रेड्डी आणि सिद्दीपेतमध्ये जोरदार पाऊस झाला होता. हवामान विभागाने हैदराबाद, आदिलाबाद, निजामाबाद, करीमनगर, वारंगल आणि खम्मम येथे मुसळधार पावसाचा इशारा दिला होता आहे.
हाय अलर्ट
राज्याच्या मुख्य सचिवांनी पोलीस महासंचालक (डीजीपी) आणि इतर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसह बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्याचसोबत जिल्हाधिकारी, उच्च पोलीस अधिकारी आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना हाय अलर्टवर राहण्यास सांगण्यात आलं आहे.