परदेशात शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कॅनडा हा सर्वात लोकप्रिय देशांपैकी एक आहे. विशेषतः पंजाबमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने कॅनडामध्ये शिकण्यासाठी जातात. ही संख्या गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वाढताना दिसून येत आहे. मात्र, कॅनडा सरकारने आता आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या व्हिसाच्या संख्येत पुढील दोन वर्षांसाठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कॅनडा सरकारच्या या निर्णयाचा परिणाम भारतीय विद्यार्थ्यांवरही होण्याची शक्यता आहे. कॅनडाच्या या निर्णयामुळे जोडीदाराबरोबर कॅनडात शिक्षणासाठी जाणाऱ्या सौभाग्यकांक्षिणींचं स्वप्न भंगलं आहे.
अंडरग्रेजुएट कोर्सेससाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या जोडीदारासाठी वर्क परमिट मिळणार नसल्याची घोषणा कॅनडा सरकारने केली. या नव्या नियमामुळे पंजाबमधील अनेकांचं स्वप्न भंगलं आहे. पदव्युत्तर, डॉक्टरेट, कायदा किंवा वैद्यक अभ्यासक्रमातील जोडीदारांनाच वर्क परमिट मिळणार आहे.
पंजाबमधील पल्लवी शर्मा या २० वर्षीय तरुणीला कॅनडात जाऊन पदवीपूर्व शिक्षण घ्यायचं होतं. त्यासाठी तिने ६.५ बँड गुणांसह आयईएलटीएस उत्तीर्ण केली. गेल्या महिन्यात तिचा कॅनडास्थित मुलाशी साखरपुडाही झाला. तिच्या होणाऱ्या पतीने तिच्या विद्यार्थी व्हिसाचा खर्च उचलण्याची तयारी दर्शवली होती. परंतु, कॅनडाच्या या नव्या नियमामुळे तिचं स्वप्न भंगलं आहे.
हेही वाचा >> विश्लेषण : कॅनडाकडून दोन वर्षांसाठी विद्यार्थी व्हिसात कपात करण्याचा निर्णय; भारतीय विद्यार्थ्यांवर परिणाम होणार?
द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना पल्लवीने तिची निराशा व्यक्त केली, “बारावी पूर्ण केल्यानंतर, मी कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्समध्ये डिप्लोमा केला आणि ६.४ बँडसह IELTS पास केले. आर्थिक अडचणींमुळे मी लग्नानंतर कॅनडात जाण्याचा निर्णय घेतला. सगळी व्यवस्था झाली होती आणि माझा साखरपुडाही झाला होता. परंतु नवीन नियमांमध्ये असे नमूद केले आहे की अंडरग्रेजुएट प्रोग्राममधील विद्यार्थ्यांच्या जोडीदारांना ओपन वर्क परमिट मिळू शकत नाही. माझ्या होणाऱ्या पतीच्या कुटुंबाच्या आर्थिक मदतीशिवाय मी माझी स्वप्नं पूर्ण करू शकत नाही. माझं कुटुंब माझी फी भरू शकत नाहीत.” दरम्यान, पल्लवी हे प्रातिनिधिक उदाहारण आहे. तिच्याचप्रमाणे पंजाबमधील अनेक मुलींचं स्वप्न भंग पावलं आहे.
लुधियानामधील ढोलेवाल भागातील रहिवासी गुरप्रीत सिंग प्लाहा याने मे महिन्यात आपल्या पत्नीला कॅनडाला पाठवण्याची योजना आखली होती. मात्र, ओपन वर्क परमिट नसल्यामुळे त्याच्या आकांक्षा आता धुळीला मिळाल्या आहेत. प्लाहा हा अविवाहित आहे. त्याला ‘आयईएलटीएस-पास’ मुलीशी लग्न करायचं आहे.
पंजाबमधून कॅनडात जाणारा मार्ग
पंजाबमध्ये असे आयईएलटीएस विवाह कॅनडाला जाण्याचा एक नवा मार्ग बनत आहे. पंजाब कृषी विद्यापीठाने (PAU) १९९० ते २०२२ या कालावधीत “ग्रामीण पंजाबमधून परदेशी स्थलांतराचा अभ्यास: ट्रेंड, कारणे आणि परिणाम” या शीर्षकाच्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की ९.५१ टक्के पंजाबी जोडीदार व्हिसावर परदेशात स्थलांतरित झाले. या स्थलांतरितांपैकी ५० टक्क्यांपेक्षा जास्त पुरुष होते. या बदलाचे श्रेय ‘काँट्रॅक्ट मॅरेज’च्या नवीन ट्रेंडला कारणीभूत ठरले आहे.
गेल्या काही वर्षांपासून पंजाबमध्ये लग्न जुळवण्याचे नवे मार्ग निर्माण झाले होते. कॅनडात स्थायिक होण्याकरता येथील तरुण-तरुणी आयईएलटीएसची परीक्षा उत्तीर्ण होऊन जोडीदाराबरोबर कॅनडात स्थायिक होतात.
लुधियानाच्या बस स्टँडजवळ राहणारे अमृत सैनी यांनी शेअर केले, “माझे पालक एका कुटुंबाशी चर्चा करत होते. ज्यांच्या मुलीने मे इनटेकमध्ये सुरू होणाऱ्या डिप्लोमा कोर्ससाठी IELTS पास केले होते. परंतु, कॅनडाच्या नवीन नियमांनी आता माझ्या योजनांवर पाणी फेरले आहे. ”
इमिग्रेशन संस्थांवर होणार परिणाम
कॅनडातील व्हिसाचा नवा नियम इमिग्रेशन एजन्सीवरही परिणाम दूरगामी करणारे आहेत. लुधियाना येथील कपरी एज्युकेशन अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस इंक. मधील नितीन चावला म्हणाले, “या नियमामुळे कॅनडात जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वप्न भंगणार आहे. अनेक इमिग्रेशन सल्लागारांच्या कार्यालयांमध्ये पती-पत्नी व्हिसाशी संबंधित फायलींचा मोठा गठ्ठा जमला आहे. आता, अंडरग्रॅज्युएट विद्यार्थ्यांच्या जोडीदारांसाठी खुले वर्क परमिट संपल्यामुळे अनेक इमिग्रेशन आणि आयईएलटीएस संस्था डबघाईला जाण्याची शक्यता आहे.