जपानी संशोधकांनी विकसित केले तंत्रज्ञान
जेम्स बाँडचा ‘डाय अनदर डे’ हा चित्तथरारक चित्रपट ज्यांनी पाहिला असेल त्यांना त्यात वापरलेली पारदर्शक मोटार कदाचित आठवत असेल तशी मोटार बनवण्यास उपयुक्त तंत्रज्ञान आता जपानी संशोधकांनी विकसित केले आहे.
या मोटारीत तुम्हाला बाहेरचे सगळे जगच आत सामावल्यासारखे वाटते. ही मोटार पार्किंग करताना त्यामुळे सोपे जाते. मागच्या आसनांवर बसणाऱ्या व्यक्तींना गाडी चालू असताना मागचे विस्तीर्ण दृश्य अनुभवता येते असे ‘डेली मेल’ने  दिलेल्या बातमीत म्हटले आहे.
जे चालक समांतर पार्किंग करतात त्यांना ते बरेच अवघड जाते. त्यांना मोटार पारदर्शक असेल तर समांतर पार्किंग करणे सोपे जाईल, कारण मागे वाहन आहे किंवा नाही ते कळेल. ही मोटार आतून पारदर्शक असल्याने पार्किंग करताना मागच्या बाजूला कुणी उभे असेल किंवा काही अडथळा असेल तरी ते समजणार आहे. अर्थात ही मोटार आतून बाहेर पाहताना पारदर्शक असणार आहे. जेम्स बाँडच्या ‘डाय अनदर डे’ या चित्रपटातील गुप्तहेराची अ‍ॅस्टन मार्टिन व्हॅक्विश ही गाडी लाइट एमिटिंग पॉलिमर स्किनची पाश्र्वभूमी वापरून अदृश्य होते. त्याच्या जोडीला जग्वार एक्सके-आर या गाडीचा आइसलँडच्या गोठलेल्या सरोवरातून पाठलाग करताना स्वयंचलित बंदुका बॉनेटच्या शीतकरण भागातून टायरवर झाडल्या जातात. आताच्या या प्रत्यक्षातील गाडीत मात्र चित्रपटासारखे सगळे शक्य करता आलेले नाही, पण त्यातील दोन कॅमेऱ्यांच्या मदतीने मोटारीच्या मागच्या भागातील दृश्ये दिसतात.
संडे टाइम्सने म्हटले आहे, की प्रतिमा संगणकाच्या मदतीने एकत्र करून त्या आसनासमोरील पडद्यावर दिसतात व त्यामुळे चालकाच्या आसनावरून पाहिल्यानंतर मोटार पारदर्शक असल्याचा आभास निर्माण होतो. या मोटारीची संकल्पना जपानी वैज्ञानिकांनी मांडली असून प्रत्यक्ष या तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शक मोटार तयार केली जात आहे. यात मोटारीचे दरवाजेही पारदर्शक असल्याने बाजूने जाणाऱ्या सायकलस्वाराला, दुचाकीस्वाराला धक्का लागून तो पडून मरण्याच्या घटना कमी होणार आहेत.

Story img Loader