गेल्या ८ महिन्यांपेक्षा जास्त काळ फक्त भारतच नाही तर आख्ख्या जगाला वेठीला धरणारा करोना बॅकफूटवर गेल्याचं आशादायी चित्र देशात निर्माण होऊ लागलं आहे. एकीकडे देशात दुसऱ्या लाटेची चर्चा असताना सध्याची आकडेवारी मात्र काहीशी दिलासा देणारी आहे. गेल्या २४ तासांत देशभरात फक्त १२ हजार ८८१ नवे करोना बाधित सापडले आहेत. त्यामुळे करोनाचा फैलाव कमी वेगाने होत असल्याचं दिसून येत आहे. पण त्याचवेळी करोनाबाबत नागरिक जास्तच निर्धास्त झाल्यामुळे देशात दुसऱ्या करोना लाटेची देखील चर्चा सुरू झाली आहे. ही दुसरी लाट अधिक तीव्र आणि अधिक वेगाने पसरू शकते, असा अंदाज वैद्यक तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

 

मृत्यूदरामुळे चिंता कायम!

गेल्या २४ तासांमधली देशातली करोनाची आकडेवारी पाहाता राजधानी दिल्लीसह एकूण १६ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये करोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. मात्र, तरीदेखील मृतांच्या आकड्यात सातत्याने पडणारी भर आरोग्य प्रशासनासाठी चिंतेची बाब ठरत आहे. दिवसभरात करोनामुळे १०१ मृत्यूंची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडा सातत्याने १००च्या वर राहत आहे. देशभरात आत्तापर्यंत करोनामुळे १ लाख ५६ हजार १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आकडेवारी काय सांगते?

एकीकडे मृतांचा आकडा वाढला असताना एकूण करोना बाधितांच्या आणि कोविड रुग्णांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांमधल्या १२,८८१ रुग्णांसोबत देशातल्या एकूण बाधितांची संख्या आता १ कोटी ९ लाख ५० हजार २०१ वर पोहोचली आहे. यापैकी फक्त १ लाख ३७ हजार ३१० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जगाचा विचार करता गभरात बाधितांचा आकडा ११० कोटी ४ लाख ३५ हजार ८०५ इतका झाला आहे. आजघडीच्या जगाच्या लोकसंख्येच्या हा आकडा सुमारे १५ टक्के आहे. यापैकी २ कोटी ४ लाख ४१ हजार ४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर २२ कोटी ६ लाख ६५ हजार ५६० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Story img Loader