करोनाचा नवा व्हेरिएंट जगभरात हातपाय पसरतो आहे. दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग आणि बोटस्वानानंतर आता करोनाचा B.1.1529 हा व्हेरिएंट इस्राईलपर्यंत पोहचला आहे. इस्राईलच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण आफ्रिकेत मोठ्या प्रमाणात संसर्गाला कारणीभूत ठरलेला अधिक धोकादायक करोना व्हेरिएंट इस्राईलमध्ये सापडला आहे. इस्राईलमध्ये नव्या विषाणूचा संसर्ग झालेला रूग्ण मलावीमधून परतला होता.
इस्राईलमध्ये मलावीशिवाय इतर देशांमधून परतलेल्या अन्य २ प्रवाशांमध्ये देखील या नव्या व्हेरिएंटचा संसर्ग आढळला आहे. त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.
इस्त्रायलमध्ये लसीकरण झाल्यानंतरही करोनाची लागण
विशेष म्हणजे इस्राईलमध्ये संसर्ग झालेले तीनही रूग्णांचं लसीकरण झालेलं होतं. यानंतरही नव्या करोना व्हेरिएंटचा संसर्ग झालाय. त्यामुळे या व्हेरिएंटने इस्राईलसह जगभरातील आरोग्य यंत्रणेची काळजी वाढवलीय. असं असलं तरी इस्राईलमधील या संसर्गित रूग्णांचे लसीकरणाचे किती डोस झाले होते याची स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत अनेक पटीने घातक विषाणू
याआधी जगभरात धोकादायक समजल्या गेलेल्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अनेक पटीने हा नवा व्हेरिएंट घातक असल्याचं समोर येतंय. डेल्टा व्हेरिएंटमध्ये दोन म्युटेशन झाले होते. मात्र, या व्हेरिएंटमध्ये तब्बल १० म्युटेशन झालेले आहे. त्यामुळे याची संसर्ग क्षमता वाढली आहे.
दक्षिण आफ्रिकेत सापडला करोनाचा डेल्टापेक्षाही भयानक व्हेरिएंट
दक्षिण आफ्रिकेत करोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. हा व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही भयानक असल्याने आता जगभरातच चिंतेचं वातावरण आहे. त्यामुळे आता भारताला आणि भारतीयांनाही विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.
करोनाचा एक नवा व्हेरिएंट दक्षिण आफ्रिकेत आढळल्याने तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. करोनाच्या नव्या व्हेरिएंट संदर्भात नवीन माहिती देताना दक्षिण आफ्रिकेच्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, दक्षिण आफ्रिकेत मल्टिपल म्युटेशन क्षमता असलेला हा नवा व्हेरिएंट आढळला आहे. दक्षिण आफ्रिकेतील करोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यानंतर या नव्या व्हेरिएंटची माहिती समोर आली आहे. वायरोलॉजिस्ट ट्यूलिओ जी ओलिवेरा यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. “दुर्दैवाने आम्हाला करोनाच्या नव्या व्हेरिएंटची माहिती मिळाली आहे. जो दक्षिण आफ्रिकेतील वाढत्या करोना संक्रमणाचे कारण आहे.”
जगभरात ठिकठिकाणी नव्या व्हेरिएंटचा संसर्ग
ओलिवेरा अधिक पुढे म्हणाले की, हा व्हेरिएंट B.1.1.529 या नावाने ओळखला जातो. या विषाणूचे बोटस्वानामध्ये ३, दक्षिण आफ्रिकेत ६ तर हाँगकाँगमध्ये १ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकारही सावध झालं असून आरोग्य मंत्रालयाने बोटस्वाना, दक्षिण आफ्रिका आणि हाँगकाँगमधून येणाऱ्या प्रवाशांच्या किंवा त्या मार्गे इतर देशातून येणाऱ्या प्रवाशांची काटेकोरपणे तपासणी करण्याच्या सूचना सर्व राज्यांना दिल्या आहेत.
हेही वाचा : कोवॅक्सिन लस फक्त ५० टक्केच प्रभावी? लान्सेटमध्ये प्रकाशित अभ्यासाचा निष्कर्ष!
याविषयी इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार, देशातली राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या संयुक्त बैठकीत बोलताना आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, भारताच्या राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राने सरकारला ह्या विषाणूबद्दलची माहिती दिली आहे. हा विषाणूने वेगाने प्रसार होणारा असून यामुळे सार्वजनिक आरोग्याला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व राज्यांनी या भागातून येणाऱ्या प्रवाशांची काटेकोरपणे आणि आरोग्य मंत्रालयाने घालून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करुन तपासणी करावी तसंच त्यांची नोंद ठेवावी.