करोनाप्रतिबंधक लशीला दाद देत नसल्याने चिंता

नवी दिल्ली : सार्स सीओव्ही २ या कोविड विषाणूचा नवा उपप्रकार दक्षिण आफ्रिका व इतर देशात सापडला असून तो जास्त संसर्गजन्य आहे. शिवाय लशींनी निर्माण केलेल्या प्रतिकारशक्तीला तो दाद देत नाही, असे एका अभ्यासात म्हटले आहे.

नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर कम्युनिकेबल डिसीजेस व क्वाझुलू नॅटल रीसर्च इनोव्हेशन अँड सिक्वेन्सिंग प्लॅटफॉर्म या संस्थांनी याबाबत संशोधन केले आहे.

सी १.२ हा विषाणू मे महिन्यात दक्षिण आफ्रिकेत आढळून आला होता. पण नंतर  चीन, काँगो, मॉरिशस, इंग्लंड, न्यूझीलंड, पोर्तुगाल व स्वित्र्झलड येथे तो १३ ऑगस्टपर्यंतच्या काळात आढळला आहे. मेडआरएक्सआयव्ही या नियतकालिकात याबाबतचा संशोधन निबंध प्रसारित करण्यात आला असून त्या विषाणूचे मूळ दक्षिण आफ्रिका हे आहे.

नवीन विषाणू जास्त उत्परिवर्तनांचा असून काळजी करावी अशा विषाणू प्रकारात त्याचा समावेश करण्यात आला आहे. सी.१.२ या विषाणूचे दक्षिण आफ्रिकेतील अस्तित्व व त्याचा इतर जगातील प्रसार याचा अभ्यास अजूनही चालू आहे. अजून त्याचा प्रातिनिधिक स्वरूपाचा अभ्यास झाला आहे असे म्हणता येणार नाही.

या विषाणूचा प्रसार दक्षिण आफ्रिकेत  वाढत असून त्याची जनुकीय क्रमवारी मे महिन्यात ०.२ टक्के, जूनमध्ये १.६ टक्के तर जुलैत २ टक्के याप्रमाणात होती. बिटा व डेल्टा विषाणूंप्रमाणेच या विषाणूचा प्रसार होत असून वर्षभरात सी.१.२ त्यात वर्षभरात ४१.८ उत्परिवर्तने झाली आहेत. इतर विषाणू प्रकारांच्या जागतिक उत्परिवर्तन दरापेक्षा हा दर  खूपच जास्त आहे. सी.१.२ विषाणूंमध्ये ही उत्पर्वितने झाली असून त्याच्या काटेरी प्रथिनात आणखी एक वेगळे उत्पर्वितन झालेले आहे. यातील ५२ टक्के उत्परिवर्तने घातक विषाणूंमध्ये दिसून आली होती. त्याच्यात एन ४४० के व वाय ४४९ एच ही उत्परिवर्तने दिसून आली आहेत. चिंताजनक विषाणूतील उत्परिवर्तनांप्रमाणे ती नसली तरी हा विषाणू शरीरातील वर्ग ३ च्या प्रतिपिंडांना चकवा देत असतो.

विषाणूतील उत्परिवर्तने ही घातक ठरत असून त्यामुळेच हा विषाणू इतरांपेक्षा वेगळा आहे. अल्फा व बिटा या विषाणूंमध्ये जसा प्रतिपिंडाना चकवा दिला जातो तसाच यात दिला जातो.

घातक उत्परिवर्तने असल्याने या विषाणूचा समावेश चिंताजनक विषाणूत केला जात आहे.

देशातील उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत सलग सहाव्या दिवशी वाढ

नवी दिल्ली : गेल्या २४ तासांत देशात ४२,९०९ जणांना करोनाचा संसर्ग झाल्यामुळे करोनाबाधितांची एकूण संख्या ३,२७,३७,९३९ वर पोहोचली. याच वेळी, उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत सलग सहाव्या दिवशी वाढ नोंदवण्यात आली.

याच कालावधीत करोनामुळे ३८० जण मृत्युमुखी पडल्याने करोनामृत्यूंचा एकूण आकडा ४,३८,२१० इतका झाला असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटले आहे. मृत्युदर १.३४ टक्के इतका आहे.

उपचाराधीन रुग्णांची संख्या ३,७६,३२४ पर्यंत वाढली असून ती एकूण करोनाबाधितांच्या १.१५ टक्के आहे. तर, एकूण ३,१९,२३,४०५ लोक आतापर्यंत बरे झाले असून हे प्रमाण ९७.५१ टक्के इतके आहे. करोना संसर्गाचा दर ३.०२ टक्के इतका नोंदवण्यात आला. ३५ दिवसांनंतर तो ३ टक्क्यांच्या वर गेला आहे.

देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत करोना प्रतिबंधक लशींच्या एकूण ६३.४३ कोटी मात्रा देण्यात आल्या आहेत.

गेल्या २४ तासांत मरण पावलेल्या ३८० जणांमध्ये महाराष्ट्रातील १३१, तर केरळमधील ७५ जण आहेत.

‘तिसऱ्या लाटेची तीव्रता दुसऱ्या लाटेपेक्षा कमी’

नवी दिल्ली : करोनाच्या सध्याच्या विषाणूपेक्षा अधिक जालीम प्रकार सप्टेंबपर्यंत तयार झाला, तर ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान भारतात करोनाची तिसरी लाट शिखरावर पोहचेल; मात्र तिची तीव्रता दुसऱ्या लाटेपेक्षा बरीच कमी राहण्याची अपेक्षा आहे, असे करोना महासाथीच्या गणितीय प्रारूपाशी संबंधित एका शास्त्रज्ञाने म्हटले आहे.

कुठलाही नवा प्रकार तयार झाला नाही, तर सध्याच्या परिस्थिती बदलण्याची शक्यता कमी आहे, असे करोना संसर्गातील संभाव्य वाढीचे भाकीत करण्याचे काम सोपवण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या तीन सदस्यीय चमूत सहभागी असलेले आयआयटी कानपूरचे शास्त्रज्ञ मणिंद्र अग्रवाल यांनी सांगितले.

तिसऱ्या लाटेने शिखर गाठल्यास, दररोज १ लाख लोकांना करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. मे महिन्यात भीषण अशी दुसरी लाट शिखरावर असताना देशात दररोज ४ लाख लोक करोनाबाधित होत होते. दुसऱ्या लाटेत हजारो लोक मरण पावले आणि लाखो लोकांना संसर्ग झाला.