एपी, सोल

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी नवीन संरक्षण बुधवारी स्वाक्षरी केली. त्यानुसार कोणत्याही देशावर हल्ला झाल्यास परस्पर मदत केली जाणार आहे. दोन्ही नेत्यांनी या कराराचे वर्णन ‘दोघांच्या संबंधातील एक मोठी सुधारणा’ असे केले आहे. या करारात सुरक्षा, व्यापार, गुंतवणूक आणि सांस्कृतिक, मानवतावादी संबंधांचा समावेश आहे.

दोन्ही देशांमधील करार १९९१ मध्ये सोव्हिएत युनियन कोसळल्यानंतर मॉस्को आणि प्योंगयांगमधील सर्वात मजबूत संबंधांची आठवण करून देतो, असे या नेत्यांनी सांगितले. ‘दोन देशांमधील आतापर्यंतचा हा सर्वांत मजबूत करार आहे. याद्वारे युक्रेनमधील युद्धास रशियाला पूर्ण पाठिंबा देण्याचे वचनही देण्यात आले,’ असे किम यांनी सांगितले. तर दोन्ही देशांमधील संबंध उच्च पातळीवर नेण्याची इच्छा प्रतिबिंबित करणारा हा करार असल्याचे पुतीन यांनी म्हटले आहे.

हेही वाचा >>>केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ

२४ वर्षांच्या कार्यकाळात व्लादिमीर पुतिन पहिल्यांदाच उत्तर कोरियाला भेट देत असताना या दोघांची शिखर परिषदेत भेट झाली. बुधवारी झालेल्या शिखर परिषदेत दोन्ही नेत्यांना पश्चिमी राष्ट्रांच्या वाढत्या विरोधाचा सामनाही करावा लागला. किम यांच्या अण्वस्त्रांचा आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमांचा धोका वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन युक्रेनमधील युद्धासाठी मॉस्कोला आर्थिक साहाय्य आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या बदल्यात आवश्यक युद्धसामग्री पुरवत असल्याबद्दल अमेरिका आणि मित्रराष्ट्रांनी चिंता व्यक्त केल्यानंतर ही परिषद पार पडली.