राष्ट्रपती भवनाच्या विशाल परिसरातील विविध ठिकाणी डेंग्यूच्या डासांची उत्पत्तीकेंद्रे असल्याचे आढळल्याने नवी दिल्ली महापालिकेने ऑगस्ट महिन्यांत आतापर्यंत राष्ट्रपती भवनावर ८० नोटिसा बजाविल्या आहेत.
राष्ट्रपती भवनाचा परिसर मोठा असून तेथे पाहणी करीत असताना विविध ठिकाणी विशेषत: राष्ट्रपती भवन कर्मचाऱ्यांच्या सदनिकांजवळ डेंग्यूच्या डासांची उत्पत्तीकेंद्रे असल्याचे आढळले. त्यामुळे अशा उत्पत्तीकेंद्रांना आळा घालण्यासाठी या महिन्यांत आम्ही विविध विभागांवर ८० नोटिसा बजावल्या असल्याचे पालिकेच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. राष्ट्रपती भवनातील डेंग्यू डास उत्पत्तीकेंद्रे नियंत्रणात आणण्यासाठी कोणत्या उपाययोजना आखता येतील याबाबत राष्ट्रपती भवनाच्या संचालकांशी चर्चा केल्यानंतर पालिकेने चार सदस्यांचे एक पथक स्थापन केले आहे. या समितीमध्ये सांडपाणी निचरा, फलोद्यान, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पालिकेच्या हिवताप निर्मूलन विभागातील प्रत्येकी एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. सदर पथक राष्ट्रपती भवनातील डास उत्पत्तीकेंद्रांच्या स्थितीची पाहणी करून त्याचे नियंत्रण करण्यास मदत करतील, असे अधिकाऱ्याने सांगितले. डेंग्यू डासांची उत्पत्तीकेंद्रे आढळल्याने यापूर्वी चार रुग्णालयांवर नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा