पीटीआय, नवी दिल्ली

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा १८ झाला असून त्यात ११ महिला व पाच मुलांचा समावेश आहे. या घटनेत अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही चेंगराचेंगरी नेमकी कशामुळे झाली, याची चौकशी दिल्ली पोलीस आणि रेल्वेने सुरू केली आहे. दुसरीकडे विरोधकांनी या घटनेवरून सरकारवर टीका केली. रेल्वेने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख, गंभीर जखमींना प्रत्येकी अडीच लाख तर किरकोळ जखमींना एक लाखाची मदत जाहीर केली.

शनिवारी रात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन केल्याची घोषणा रेल्वेने रविवारी केली. या समितीने रेल्वे स्थानकातील सर्व ध्वनिचित्रफितींचे चित्रीकरण ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. चौकशी समितीमध्ये उत्तर रेल्वेचे प्रधान मुख्य व्यावसायिक व्यवस्थापक नरसिंग देव आणि उत्तर रेल्वेचे प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त पंकज गंगवार यांचा समावेश आहे. नेमकी चेंगराचेंगरी कशामुळे झाली, हे अद्याप स्पष्ट झाले नसून वेगवेगळे दावे केले जात आहेत. दर तासाला तब्बल १,५०० तिकिटांची विक्री झाल्यामुळे गर्दी अचानक वाढल्याचे सांगितले जात आहे.

रात्री नवी दिल्लीहून प्रयागराजला चार रेल्वेगाड्या जाणार होत्या. त्यापैकी तीन गाड्या विलंबान धावत होत्या. त्यामुळे स्थानकात गर्दी होती. फलाट क्रमांक १४वर प्रयागराज एक्स्प्रेस उभी असताना फलाट क्रमांक १६वर प्रयागराज विशेष या गाडीची उद्घोषणा झाली. त्यामुळे नेमकी आपली गाडी कोणती, यावरून प्रवाशांचा गोंधळ उडाला. त्यातच फलाट क्रमांक १४ आणि १५ला जोडणारा जिना अरुंद होता. एकाच वेळी हजारो प्रवाशांनी जिन्याकडे धाव घेतल्यामुळे चेंगराचेंगरी झाली असावी, असा अंदाज आहे. रेल्वेप्रमाणेच दिल्ली पोलिसांनी चेंगराचेंगरीच्या घटनेचा तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून गोंधळ उडायला नेमक्या कोणत्या घटना कारणीभूत झाल्या ते निश्चित केले जाईल. तसेच रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींकडूनही माहिती घेतली जाईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. गर्दीचा मोठा रेटा झाल्याने काहींचा तोल गेला आणि ते आणखी काही लोकांना घेऊन खाली कोसळले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी ज्ञानेंद्र सिंह यांनी दिली. तर लोक केवळ जीवाच्या आकांताने धावत होते. त्यांचे सामान, चपला-बूट इतस्त: विखुरले होते, जमिनीवर फुटलेल्या बांगड्यांचा खच पडला होता. एका लहान मुलाचे शाळेचे दप्तरही होते, असे एका रेल्वे कर्मचाऱ्याने सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री अश्निवी वैष्णव, उत्तर प्रदेशचे मु्ख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले. तर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा रेल्वेचे अपयश आणि सरकारची असंवेदनशीलता अधोरेखित झाल्याची टीका केली. प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांची मोठी संख्या पाहता रेल्वे स्थानकांत अधिक चांगली व्यवस्था करायला हवी होती, असे ते म्हणाले. तर केंद्र सरकार चेंगराचेंगरीच्या घटनेमध्ये लपवाछपवी करण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी केली. रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार साकेत गोखले यांनी केली.

संभाव्य कारणे

●रेल्वे सुटण्यास झालेला विलंब

●तासाला तब्बल १५०० तिकिटांची विक्री

●अरुंद जिन्यावर गर्दीचा रेटा

●एकाच वेळी नामसाधर्म्य असलेल्या दोन एक्स्प्रेस

●गाडीच्या फलाट क्रमांकात ऐनवेळी बदल

Story img Loader