फेसबुक या विशेष लोकप्रिय असलेल्या सोशल नेटवर्किंग संकेतस्थळाने ‘ग्राफ सर्च’ ही नवीन सुविधा उपलब्ध करून दिली असून त्यामुळे लोक, छायाचित्रे, ठिकाणे यांच्याबाबतची माहिती अधिक विशिष्ट पद्धतीने शोधणे सोपे होणार आहे. ग्राफ सर्चमध्ये आपण ‘फोटोज ऑफ माय फ्रेंड्स’, ‘फोटोज ऑफ माय फ्रेंड्स बिफोर १९९० अपलोडेड बाय माय मॉम’ अशा प्रकारचे शोधदुवे देऊन माहिती, छायाचित्रे मिळवता येतात.
सध्या ही सेवा बिटा स्वरूपात असून मंगळवारी मोजक्याच लोकांनी या सेवेचा लाभ घेतला. या प्राथमिक वापरकर्त्यांकडून मिळालेल्या निष्कर्षांच्या आधारे ही सेवा आणखी सुधारून फेसबुक समुदायाला मोठय़ा प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झकरबर्ग यांनी कॅलिफोर्नियातील मेन्लो पार्क येथील मुख्यालयात पत्रकार परिषदेत ‘ग्राफ सर्च’ या नवीन सुविधेची घोषणा केली. फेसबुकची ही कल्पना विशेष चालली तर त्यामुळे गुगल, रेटिंग सेवा असलेली येल्प, नेटफ्लिक्ससारख्या स्ट्रीमिंग साइट्स यांना मोठा फटका बसू शकतो.
लोकांनी नुकत्याच देवघेव केलेल्या माहितीसाठी एक सर्च टूल असावे असे वापरकर्त्यांना वाटत होते. या सुविधेमुळे फेसबुकला नवीन उद्योगांची दारे खुली होणार आहेत. जेव्हा एखादा वापरकर्ता ‘म्युझिक माय फ्रेंड लाइक’, ‘टीव्ही शो माय फ्रेंड लाइक’ किंवा ‘रेस्टॉरंट्स फ्रॉम माय फ्रेंडस फ्रॉम इंडिया लाइक’ अशा प्रकारचे शोधदुवे देईल, त्या वेळी तुमचा शोध सरतेशेवटी मीडिया कंटेन्ट वा स्थानिक उद्योग यांच्याशी जाऊन थांबेल. मित्राने सुचवलेल्या चित्रपटाची, मालिकांची, रेस्टॉरंटची थेट लिंक तुम्हाला मिळेल. त्यातून पैसा कमावण्याची संधी आहे, पण सध्या तरी ग्राफ सर्चचा वापर सुरूवातीला पैसा कमावण्यासाठी केला जाणार नाही, असे झकरबर्ग यांनी सांगितले.
कसा असेल ग्राफ सर्च?
गुगलच्या वेब सर्चपेक्षा ग्राफ सर्चचा अनुभव फार वेगळा आहे. अनेक लिंक आपणांस या सर्चमध्ये एकाचवेळी मिळतील. या नव्या सुविधेत पहिल्यांदा विशिष्ट शोध विनंत्याच स्वीकारल्या जातील. त्यात लोक, ठिकाणे, फोटो व आवडीचे विषय यांचा समावेश असेल. त्याची उत्तरे वापरकर्त्यांशी संबंधित लोकांकडे त्याबाबत असलेल्या माहितीपर्यंत सीमित असतील. झुकेरबर्ग यांनी सांगितले की, आम्ही इंटरनेटचे निर्देशांकन करीत नाही आहोत, तर समुदायाकडे असलेल्या माहितीचे निर्देशाकंन करीत आहोत. वापरकर्त्यांना या सुविधेमुळे नेटवर्कवरील २४० अब्ज छायाचित्रे, एक ट्रिलियन युजर्स लाइक्स व वापरकर्त्यांमधील संबंध यातून मुशाफिरी करता येईल. यात वापरकर्त्यांने सार्वजनिकरीत्या पाहता येईल असे म्हटलेली माहितीच बघता येईल.
वैशिष्टय़े :
* गुगल सर्च, येल्प व नेटफ्लिक्सला स्पर्धा
* २४० अब्ज छायाचित्रे, एक ट्रिलियन लाइक्स उपलब्ध
* ‘म्युझिक माय फ्रेंड लाइक’ असा सर्च दिल्यावर तो सरतेशेवटी म्युझिक कंपनीच्या संकेतस्थळापर्यंत जाणार
* ठिकाणे, लोक, छायाचित्रे शोधता येणार
फेसबुकच्या शोधकतेचा ‘ग्राफ’ वाढला
फेसबुक या विशेष लोकप्रिय असलेल्या सोशल नेटवर्किंग संकेतस्थळाने ‘ग्राफ सर्च’ ही नवीन सुविधा उपलब्ध करून दिली असून त्यामुळे लोक, छायाचित्रे, ठिकाणे यांच्याबाबतची माहिती अधिक विशिष्ट पद्धतीने शोधणे सोपे होणार आहे.
First published on: 17-01-2013 at 05:04 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New graph search facility by facebook