पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे शत्रूंच्या मनात भारताविषयी भीती निर्माण झाली असून दहशतवादाबाबतचं निष्क्रियतेचं युग आता संपलं असल्याचं योगी आदित्यनाथ म्हणाले. “ये नया भारत बोलता नहीं है, घुस कर मारता भी है”, असं योगी आदित्यनाथ मंगळवारी रामपूरमध्ये खासदार आणि भाजपाचे उमेदवार घनश्याम लोधी यांच्या समर्थनार्थ एका सार्वजनिक मेळाव्याला संबोधित करताना म्हणाले.
शत्रूंच्या मनात भीती निर्माण झाली
“तुम्ही करतारपूर साहिब करॉरिडॉर पाहिलंच असेल. पाकिस्तान काँग्रेसचा अडथळा होता पण पंतप्रधान मोदींनी करतारपूर साहिबमध्ये कॉरिडॉर उघडला. मोदींनी सर्व काही केले आणि अयोध्येत रामाचे भव्य मंदिरही बांधले. आता कुठे फटाके फुटले तरी हे फटाके आम्ही फोडले नाही, असं पाकिस्तानला स्पष्ट करावं लागतं. शत्रूंच्या मनात खूप भीती निर्माण झाली आहे. शत्रू इतका घाबरला आहे. हा नवा भारत आहे. ‘नया भारत बोलता नहीं है, घुस कर मारता भी हैं’ (नवा भारत बोलत नाही , तो आत घुसून मारतो), असं योगी म्हणाले.
हेही वाचा >> चांद्रयान ४ मोहिमेबाबत इस्रोच्या प्रमुखांकडून मोठी अपडेट; म्हणाले “पुढील टप्पा…”
२०१४ पूर्वी भारतीय पासपोर्टला जागतिक स्तरावर आदर नव्हता, असंही योगी म्हणाले. गुरु गोविंद सिंग यांच्या चार साहिबजादांच्या बलिदानाचे स्मरण २६ डिसेंबर रोजी ‘वीर बाल दिवस’, करतारपूर साहिब कॉरिडॉरचे बांधकाम आणि ५०० वर्षांनंतर अयोध्येतील राम मंदिराची निर्मिती झाली, यासह मोदींच्या कार्यकाळातील अनेक कामांची त्यांनी माहिती दिली.
सबका साथ सबका विकास
जाती-आधारित राजकारणापासून दूर जाण्यावर भर देत मुख्यमंत्र्यांनी सर्वसमावेशक प्रशासनाच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि गरजेनुसार सरकारी योजना सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. जात, पंथ किंवा धर्माची पर्वा न करता संसाधने प्रत्येक भारतीयांची आहेत, असं ते म्हणाले.. “सबका साथ-सबका विकास’ या ब्रीदवाक्याअंतर्गत, पक्षपात न करता सर्वांसाठी विकासाला प्राधान्य दिले जाते. मोदी सरकार आपल्या सर्वसमावेशक धोरणांद्वारे प्रत्येक चेहऱ्यावर हसू आणण्याचे उद्दिष्ट ठेवते”, असंही ते म्हणाले.