नवी दिल्ली : संसदेची जुनी इमारत देशाच्या अनेक महत्त्वाच्या घटनांची साक्षीदार आहे. ही इमारत आजपर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांच्या अंत:करणामध्ये घर करून राहिली आहे. आता नव्या संसदेमध्ये जातो पण, जुने संसदभवन हीच आपली संसद असे वाटत राहते, अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवीन महाराष्ट्र सदनामध्ये ‘संसद भवन ते सेंट्रल विस्टा’ या वरिष्ठ पत्रकार निलेश कुलकर्णी यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात गुरुवारी पवारांनी दिल्लीतील राजकीय प्रवासाच्या अनेक आठवणी सांगितल्या. ‘अनेकांना कदाचित आठवत नसेल, पण वाजपेयींचे सरकार एक मताने कोसळले, तेव्हा मी लोकसभेतील विरोधी पक्षनेता होतो. वाजपेयी सरकारविरोधात विरोधी पक्षांनी अविश्वास ठराव आणला, मतदानाच्या वेळी सत्ताधारी पक्षाच्या एका सदस्याने वाजपेयी सरकारला मत न दिल्यामुळे ते पडले. या एका मताची किमया मी करून दाखवली पण, ती कशी केली हे आता विचारू नका’, असे पवार मिश्किलपणे म्हणाले.

१९६२ मध्ये पहिल्यांदा दिल्लीत पं. नेहरूंना भेटल्याची आठवणही पवारांनी सांगितली. त्यानंतर पवारांचा दिल्ली-मुंबई असा राजकीय प्रवास होत राहिला. १९९१ मध्ये नरसिंहरावांच्या सरकारमध्ये पवार होते पण, मुंबईतील दंगलीमुळे त्यांना मुंबईला परतावे लागले होते, त्यानंतर पवार पुन्हा दिल्लीच्या राजकारणात सक्रिय झाले, ही सक्रियता अजूनही कायम आहे, असा दिल्लीतील त्यांच्या राजकारणाचा मोठा पट पवारांनी मांडला. दिल्लीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून यशवंतराव चव्हाणपर्यंत आणि मधू लिमये, मधू दंडवते, जॉर्ज फर्नांडिस, स. का. पाटीलांपर्यंत अनेक ज्येष्ठ मराठी जनांनी दिल्ली व संसद गाजवली. स. का. पाटील यांची दिल्लीतील प्रसारमाध्यमांनी फारशी दखल घेतली नाही. पण त्यांना मुंबईचा अनभिषिक्त सम्राट म्हटले जात होते, असे पवार म्हणाले.

नव्या संसदभवनात गेल्यावर मला लग्नाच्या हॉलमध्ये गेल्यासारखे वाटले. आता आम्हाला जेवायला वाढतील असे वाटले. जुन्या संसदेमध्ये चालताना आपल्याबरोबर आपल्या देशाचा इतिहास चालतोय असे वाटायचे, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले.

महादजी शिंदेंचे मोठेपण टिकवा – राऊत

पानिपताच्या लढाईत पराभूत झाल्यानंतरही महादजी शिंदे पुन्हा दिल्लीत आले. महादजी शिंदे महान स्वाभिमानी योद्धे होते. त्यांनी तलवारीच्या बळावर दिल्लीच्या बादशहाला नाचवले होते. त्यांनी दोनदा दिल्ली जिंकली. महादजींच्या अटी-शर्तींवर इथला बादशहा राज्य करत होता. महादजींनी दिल्लीची गुलामी पत्करली नाही. शिंदे-होळकर या मराठा सरदारांनी दिल्लीचे तख्त राखले होते. महादजी शिंदेंचे मोठेपण टिकवले पाहिजे. आत्ताच्या काळातील शरद पवार हे महादजी शिंदे आहेत, असे म्हणत संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांना टोला हाणला. गेल्या आठवड्यामध्ये सरहदच्या वतीने एकनाथ शिंदेंना महादजी शिंदे पुरस्कार देण्यात आला होता, त्यावर राऊत यांनी टीका केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New maharashtra sadan sansad bhawan to central vista senior journalist nilesh kulkarni book release ceremony sharad pawar delhi ssb