जगभरात वर्षभरामध्ये लाखो बळी घेणाऱ्या मलेरियावर ऑस्ट्रेलियाच्या वैज्ञानिकांनी प्रभावी उपचार शोधून काढला आहे. ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीच्या संशोधक नताली स्पीलमन व कायरन किर्क यांनी गेली अनेक वर्षे मलेरिया ज्या परोपजीवीमुळे होतो त्या प्लाझमोडियमचा अभ्यास केला आहे. या प्लाझमोडियममुळे मलेरिया होत असतो. हा परोपजीवी एका विशिष्ट पंपाच्या मदतीने त्याच्या शरीरातून क्षार बाहेर टाकतो, असे त्यांना संशोधनातून दिसून आले आहे.
किर्क यांनी सांगितले, की क्षारांच्या प्रमाणावर हा परोपजीवी कसे नियंत्रण मिळवतो हे जाणून घेण्यासाठी आम्ही प्रदीर्घ काळ संशोधन केले आहे, जेव्हा ते नेमके कसे घडते याचा उलगडा झाला तेव्हा आम्हाला आश्चर्य वाटले. स्पीलमन यांनी सांगितले, की सिंगापूर व अमेरिकेच्या  विविध औषध कंपन्यांत काम करणाऱ्या वैज्ञानिकांनी मलेरियासारख्या प्राणघातक रोगावर औषध शोधण्यासाठी प्रयत्न चालू ठेवले आहेत. आम्ही या प्लाझमोडियमच्या क्षार बाहेर टाकणाऱ्या जैविक पंपाविषयी संशोधन केल्यानंतर आठवडा किंवा दोन आठवडय़ांत नवीन औषधाची निर्मिती करण्यात आली आहे. या औषधामुळे या प्लाझमोडियमचा क्षार पंप बंद होतो व तो मरतो असे दिसून आले आहे, असे किर्क यांनी सांगितले. आमच्या संशोधनाचा वापर औषधनिर्मितीसाठी करता आला ही आनंदाची बाब आहे. मलेरियावर वीस वर्षांनी नवीन औषधाची चाचणी रुग्णांवर होणार आहे. किर्क यांनी सांगितले, की हा रोग बरा केल्याचा दावा आपण करीत नाही, कारण हे परोपजीवी हे प्रत्येक वेळी औषधांना प्रतिरोध करण्यात यशस्वी होत असतात, त्यामुळे ही स्पर्धा अशीच चालू राहणार आहे. आम्ही औषध शोधावे आणि परोपजीवी जंतूंनी त्यावर मात करावी. प्लाझमोडियममधील क्षार बाहेर टाकणारा पंप बंद केल्याने त्याच्यात क्षाराचे प्रमाण वाढून तो मरतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा