इंडियन एअरलाइन्सच्या अपहृत विमानातील प्रवाशांच्या सुटकेसाठी १९९९ मध्ये भारताने तीन दहशतवाद्यांची मुक्तता केली होती, त्यामधील मुश्ताक अहमद झरगर या दहशतवाद्याने जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा सशस्त्र उठाव करण्याचे ठरविले आहे. झरगरने आपल्या अल उमर मुजाहिद्दीन गटाचा मुख्य तळ म्हणून पाकव्याप्त काश्मीरचा वापर करण्याचे ठरविले आहे.
काठमांडूहून उडालेल्या विमानाचे अपहरण करून ते कंदाहारला नेण्यात आले होते. त्या विमानातील प्रवाशांच्या सुटकेसाठी भारताने मौलाना मसूद अझहर आणि अहमद उमर सईद आणि झरगर यांची मुक्तता केली होती. तेव्हापासून झरगर याच्याबाबतची विशेष माहिती हाती आली नव्हती. झरगर हा श्रीनगरचा रहिवासी आहे.
झरगरची मुक्तता झाल्यापासून तो पाकव्याप्त काश्मीरची राजधानी असलेल्या मुझफ्फराबादमध्ये वास्तव्यास आहे. संसदेवरील हल्ल्यातील आरोपी अफझल गुरू याला फाशी देण्यात आल्यानंतर झरगरने आपली संघटना पुन्हा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे, असे एका वृत्तपत्राने म्हटले आहे.
काश्मीर प्रश्नावर सशस्त्र उठाव हाच एकमेव तोडगा असल्याचे मत झरगरने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये व्यक्त केले. सशस्त्र उठाव करून जम्मू-काश्मीर आझाद करणे हाच आपला हेतू असल्याचेही त्याने म्हटले आहे.
या उद्देशासाठी आपल्याला पैसा, मनुष्यबळ आणि बंदुका कोठूनही मिळतील. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या दोन्ही बाजूंना आम्ही अद्यापही प्रशिक्षण केंद्रे चालवीत आहोत, असेही त्याने म्हटले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये जिहादी कारवाया वाढविण्याचा झरगरचा मानस असल्याचे सांगण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा