नव्या संसद भवनाचं रविवारी उद्घाटन झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलं. या सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना बोलवण्यात आलं नाही म्हणून काँग्रेससह १९ विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातला होता. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातल्या आरोपांच्या फैरी होत आहेत. या अजूनही थांबलेल्या नाहीत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी सेंगोलवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. कपिल सिब्बल यांनी एक ट्वीट करत तुम्ही सांगत असलेला सेंगोलचा अर्थ आम्हाला मान्य नाही असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे.
काय म्हटलं आहे कपिल सिब्बल यांनी?
माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी नव्या संसदेचं उद्घाटन केल्यानंतर एक ट्वीट केलं आहे. “भारतीय जनता पक्षाचे नेते सेंगोलला ब्रिटिशांकडून सत्ता हस्तांतरणाचा समानार्थी शब्द मानतात. मात्र, तसं नाही. शक्य झाल्यास माझं म्हणणं ऐका. भारतात सत्तेचं हस्तांतरण त्या लोकांच्या इच्छेनं झालं ज्यांनी स्वतः हे संविधान दिलं. देवी मीनाक्षी यांनी मदुराईच्या राजाला भेट दिलेलं सेंगोल हे राज्य करण्याच्या दैवी अधिकाराचं प्रतीक होतं. ” असं सिब्बल यांनी म्हटलं आहे.
२८ मे रोजी नव्या संसदेचं उद्घाटन
देशाला २८ मे रोजी नवं संसद भवन मिळालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचं उद्घाटन करण्यात आलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुरोहितांनी वैदिक मंत्रोच्चारांमध्ये पंतप्रधान मोदींना सेंगोल म्हणजेच राजदंड सुपूर्द करण्यात आला. राजदंड हातात घेण्याआधी पंतप्रधान मोदींनी राजदंडाला दंडवत घातला. यानंतर त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबत नवीन संसद भवनात राजदंडाची स्थापना केली. जुन्या संसदेत लोकसभेत ५४३ खासदार बसू शकत होते, तर नव्या संसदेत ८८८ खासदार बसू शकतील अशी व्यवस्था आहे. तर राज्यसभेत सध्याची २५० ची क्षमता वाढवून ३८४ करण्यात आली आहे.
राजदंड म्हणजे नेमके काय?
राजाने किंवा एखाद्या राजसत्तेने धारण केलेल्या दंडाला ‘राजदंड’ असे म्हणतात. मुख्यतः धर्मदंड व राजदंड असे दोन दंड अधिकार दर्शविण्यासाठी वापरले जात होते, किंबहुना वापरले जात आहेत. पृथ्वीवरील प्राणीमात्रांच्या रक्षणासाठी साक्षात ईश्वराने या दोन सत्तांची पायाभरणी केल्याचे दाखले अनेक धर्मग्रंथांनी दिले आहेत. साम, दाम, दंड, भेद या उपायांपैकी दंड हा महत्त्वाचा आहे. दंड याचाच अर्थ शासन. त्या दंडाचे म्हणजेच शासनाचे प्रतीक म्हणून राजदंड स्वीकारण्याची परंपरा होती. हा राजदंड वस्तुतः खुद्द ‘राजाच’ अशी संकल्पना मनुस्मृतीत आढळते. हा दंड प्रजेचे शासन व रक्षण करतो. राजदंड हा मुख्यतः अधिकार व सार्वभौमत्वाचे प्रतीक आहे. जगभरातील अनेक संस्कृतींमध्ये राजा हा राजदंड धारण करतो अशा परंपरा अस्तित्त्वात होत्या व आहेत, हे आपण इंग्लंडचा राजा चार्ल्स याच्या राज्याभिषेकाच्या वेळीही पहिले. युरोपियन इतिहासात कॅरोलिंगियन लोकांनी प्रथम काष्ठाचा राजदंड वापरला होता असे मानले जाते, पुढे रोमन राजांकडून त्याची पुनरावृत्ती झाली. भारतीय संकल्पनेनुसार या मृत जगताचे दोन स्वामी (राजे) आहेत. एक भूमीवर चक्रवर्ती सम्राट म्हणून वावरतो, तर दुसरा अध्यात्मिक जगतावर आपल्या ज्ञान-साधनेने वर्चस्व गाजवतो, म्हणूनच भारतीय संस्कृतीमध्ये राजदंड व धर्मदंड यांचे साहचार्य योजले आहे.