New Parliament Building Inauguration by PM Modi Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन नुकतंच करण्यात आलं आहे. भव्य आणि आकर्षक अशी नवी संसद भारताला मिळाली आहे. संसदेच्या उद्घाटनानंतर नव्या संसदेत खासदारांसमोर उभे राहून नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. जुनी संसद असतानाही नव्या संसद भवनाची गरज काय, असा प्रश्नही विरोधकांसह जनतेकडून उपस्थित केला जात आहे. या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चोख उत्तर दिलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “संसदेच्या जुन्या भवनात सगळ्यांसाठी आपली कामं पूर्ण करणं फार कठीण होतं. तंत्रज्ञान, बसण्याच्या जागा यासंदर्भात अनेक अडचणी होत्या. गेल्या दीड-दोन वर्षांपासून ही चर्चा सातत्याने होत होती की देशाला नव्या संसद भवनाची गरज आहे. येत्या काळात खासदारांची संख्या वाढली असती. मग ते कुठे बसले असते? त्यामुळेच ही काळाची गरज होती की संसदेच्या नव्या इमारतीचं बांधकाम केलं जावं”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. उद्घाटनाच्या दुसऱ्या टप्प्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला नव्या संसद भवनातून संबोधित केलं. त्यावेळी ते बोलत होते.
“मला आनंद आहे की ही नवी इमारत अत्याधुनिक सुविधांनी सज्ज आहे. या वेळेलाही या सभागृहात सूर्याचा प्रकाश थेट येत आहे. वीजेचा अत्यल्प वापर व्हावा याचीही काळजी घेण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी आधुनिक उपकरणे आहेत, याची परिपूर्ण काळजी घेण्यात आली आहे. आज सकाळीच संसद भवनाला भेटणाऱ्या कामगारांच्या एका तुकडीला भेटलो. या संसदेत ६० हजार कामगारांना रोजगार देण्याचं काम केलं आहे. त्यांनी या नव्या इमारतीसाठी आपला घाम गाळला आहे. त्यांच्या श्रमाला समर्पित एक डिजिटल गॅलरीही बनवण्यात आली आहे. संसदेच्या निर्माणात त्यांचं योगदानही अमर झाले आहे”, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
हेही वाचा >> New Parliament Building : नव्या संसद भवनाचे उद्घाटन होताच राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राज्याभिषेक…”
भारत लोकशाहीची जननी
भारत फक्त लोकशाहीचा देश नव्हे तर लोकशाहीची जननीसुद्धा आहे. लोकशाहीची आई आहे. जागतिक लोकशाहीचा भारत एक मोठा आधार आहे. लोकशाही आपल्यासाठी फक्त एक व्यवस्था नाही, तर एक संस्कार आहे. एक विचार आहे, एक परंपरा आहे, असंही मोदी म्हणाले.