येत्या २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भारताच्या नव्या संसद इमारतीचं उद्घाटन करण्यात येणार आहे. १० डिसेंबर २०२० रोजी या इमारतीचं भूमिपूजन करण्यात आलं होतं. करोना काळातही या भागात बांधकाम चालू होतं. जवळपास दोन वर्षांनंतर ही इमारत आता बांधून तयार झाली असून येत्या रविवारी या इमारतीचं उद्घाटन केलं जात आहे. मात्र, नेमकी ही इमारत कशी आहे? देशाच्या सन्मानाचं आणि लोकशाही प्रक्रियेचं सर्वोच्च प्रतीक असणारी भारताची संसद नेमकी आहे तरी कशी?
६४ हजार चौरस मीटरहून मोठा परिसर!
नव्या संसदेची उंची ही चार मजल्यांपर्यंत आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी राखाडी आणि लाल रंगाच्या सँडस्टोन पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. हा संपूर्ण परिसर तब्बल ६४ हजार ५०० चौरस मीटरचा असून आत्तापर्यंत या एका बांधकामातून तब्बल २३ लाख ४ हजार ०९५ लोकांसाठी रोजगार निर्माण झाल्याची माहिती सेंट्रल व्हिस्टाच्या वेबसाईटच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसनं दिली आहे.
या संसद भवनाचं डिझाईन अहमदाबादमधील एचसीपी डिझाईन, प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट कंपनीने तयार केलं आहे. ही कंपनी संपूर्ण सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पासाठी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाची सल्लागार आहे. या भवनाचं बांधकाम टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडनं केलं आहे. विद्यमान संसदेजवळच उभारण्यात आलेल्या या नव्या संसद भवनामध्ये लोकसभेत एकूण ८८८ खासदार आणि राज्यसभेत ३०० सदस्यांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यमान संसदेत हीच क्षमता अनुक्रमे ५४३ आणि २५० इतकी आहे.
New Parliament House: असं आहे मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टचं स्वरुप, नवीन संसद भवन एकदा पाहाच
नव्या संसदेबद्दल आकडे काय सांगतात?
बिल्टअप क्षेत्र – ५८ हजार ७०० चौरस मीटर (आधीच्या संसदेचा बिल्टअप एरिया २४ हजार २८१ चौरस मीटर)
एकूण क्षेत्र – ६४ हजार ५०० चौरस मीटर
अंदाजित खर्च – ९७१ कोटी
सध्याची सदस्य क्षमता – १२२४
अतिरिक्त सदस्य क्षमता – ११४०
रोजगार निर्मिती – २३ लाख ४ हजार ०९५ दिवसांचा एकूण रोजगार
वापरलेलं स्टील – २६ हजार ०४५ मेट्रिक टन
वापरलेलं सिमेंट – ६३ हजार ८०७ मेट्रिक टन
वापरलेली राख (Fly Ash) – ९ हजार ६८९ क्युबिक मीटर
कलाकृतींची संख्या – ५ हजार
विद्यमान संसदेचा इतिहास काय?
देशाच्या विद्यमान संसद भवनाचं बांधकाम १९२१ साली सुरु करण्यात आलं होतं. या इमारतीचं बांधकाम पूर्ण व्हायला तब्बल ६ वर्षं लागली होती. १९२७ मध्ये हे बांधकाम पूर्ण झालं. या इमारतीच्या बांधकामाला त्या काळी सुमारे ८३ लाख रुपये खर्च असल्याचं सांगितलं जातं.