* भारताशी सीमातंटा सोडवण्यासाठी उत्सुक
* नवनिर्वाचित अध्यक्ष जिनपिंग यांचा पुढाकार
भारताशी असलेला सीमातंटा सोडवणे तितकेसे सोपे नसले तरी द्विपक्षीय संबंध राखून त्याची शांततापूर्ण सोडवणूक करणे गरजेचे आहे व त्या दृष्टीने नवे सरकार नक्कीच प्रयत्न करेल असे संकेत चीनचे नवनिर्वाचित अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी दिले आहेत. भारताशी असलेले द्विपक्षीय अधिकाधिक दृढ करण्यासाठी त्यांनी नवीन ‘पंचशील’ धोरणच जाहीर केले आहे.
अध्यक्षपदावर नियुक्ती होताच जिनपिंग यांनी चीनच्या परराष्ट्र धोरणाला नवे आयाम देण्याचा धडाका लावला आहे. भारताशी असलेले संबंध दृढ करण्यासाठी आपण आतुर असून पुढील आठवडय़ात होणाऱ्या ‘ब्रिक्स’ देशांच्या (ब्राझील, रशिया, चीन, भारत आणि दक्षिण आफ्रिका) बैठकीत पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भेटण्यासाठी उत्सुक असल्याचेही जिनपिंग यांनी स्पष्ट केले आहे. जागतिक हिताच्या दृष्टीने उभय देशांनी एकत्रित येऊन विकसनशील देशांना दिशादर्शन करणे गरजेच असल्याचे मत जिनपिंग यांनी व्यक्त केले आहे. भारत आणि चीन यांच्यातील सीमावाद खूप जुना असून त्याला ऐतिहासिक पदर आहेत. या वादाची शांततेत सोडवणूक व्हावी अशीच नव्या सरकारची धारणा असून त्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी आपले सरकार पुढाकार घेईल याचही पुनरुच्चार त्यांनी केला. जिनपिंग यांनी पंचशील धोरणही यावेळी जाहीर केले. त्यानुसार भारत आणि चीन यांनी या पंचशील धोरणांचा उभय देशांनी अवलंब करणे जागतिक हिताचे ठरेल असेही जिनपिंग यांनी स्पष्ट केले आहे. २०१० मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्याशी झालेल्या भेटीलाही त्यांनी उजाळा दिला. उभय देश वेगवान गतीने विकास साधत असून विकासाची हीच गती कायम रहायची असेल तर दोन्ही देशांमध्ये शांतता नांदणे गरजेचे असल्याचे मतही जिनपिंग यांनी अखेरीस व्यक्त केले.
हीच ती तत्त्वे..
* द्विपक्षीय संबंध योग्य मार्गावर ठेवण्यासाठी परस्परांशी योग्य संवाद राखणे
* परस्परांच्या बलस्थानांचा आदर करून पायाभूत सोयीसुविधा, गुंतवणूक व तत्सम क्षेत्रांत सुसंवाद वाढवणे
* परस्परांशी सांस्कृतिक संबंध दृढ करणे
* उभय देशांतील हितसंबंधांना सर्वोच्च प्राधान्य
* मैत्रीचे नवे पर्व सुरू करणे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा