नेपाळमध्ये  बुधवारी भूकंपाचे आणखी तेरा धक्के बसले असून मंग़ळवारपासून बसलेल्या धक्क्य़ांची संख्या ७६ झाली आहे. त्यामुळे लोकांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण कायम आहे. मंगळवारच्या भूकंपात नेपाळमध्ये ७९ जणांचा बळी गेला असून २५ एप्रिलच्या भूकंपातून सावरत असताना नेपाळला हा हादरा बसला होता. दरम्यान मंगळवारच्या भूकंपाने चीन-नेपाळ महामार्ग संपर्क तुटला आहे. झाम वसाहत ते झाम बंदर दरम्यान १३ कि.मी.च्या पट्टय़ात ढिगारा उपसण्याचे काम १२० पोलीस अधिकारी १८ उत्खनन यंत्रांनी करीत आहेत. तेथे ४० हजार घनमीटरचा ढिगारा कोसळला आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे समपदस्थ सुशील कोईराला यांच्याशी चर्चा करून त्यांना भूकंपातील पुनर्वसनासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
काठमांडूच्या ईशान्येकडील पर्वतीय जिल्ह्य़ात   बुधवारी भूकंप झाला. त्यामुळे अनेक घरे कोसळली तर काही ठिकाणी दरडी कोसळल्या. मंग़ळवारी झालेल्या भूकंपात १९८७ जण जखमी झाले आहेत. काठमांडूच्या ईशान्येला दोलखा येथे जास्त लोक मरण पावले आहेत . दरम्यान अमेरिकेचे एक लष्करी हेलिकॉप्टर बेपत्ता झाले असून त्यातील सहा नौसैनिक व दोन नेपाळी सैनिक यांचा ठावठिकाणा नाही. या हेलिकॉप्टरमध्ये इंधनाची समस्या निर्माण झाली होती . अमेरिकी विमानाने हेलिकॉप्टरचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण अंधारात काही दिसले नाही. आता नेपाळचे जवान पायी जाऊन चारीकोट भागात शोध घेत आहेत.  सुरक्षा जवानांनी ९ नेपाळी, एक अमेरिकी व एक कोरियन महिला यांना वाचवले.
पोलिसांनी सांगितले की, ७५ पैकी ३२ जिल्ह्य़ांना फटका बसला असून काठमांडूपासून पूर्वेला ८३ कि.मी. अंतरावर माउंट एव्हरेस्टजवळ १५ किलोमीटर खोलीवर भूकंपाचे केंद्र होते.
ब्रिटनची हेलिकॉप्टर्स अद्याप नेपाळच्या परवानगीच्या प्रतीक्षेत
 प्रतिनिधी : ब्रिटनच्या रॉयल हवाई दलाची मदतकार्यासाठी आलेली तीन हेलिकॉप्टर अद्याप नेपाळची परवानगी न मिळाल्याने चंदीगढ येथील हवाई दलाच्या तळावरच थांबली आहेत.  नेपाळमधील भूकंपपीडितांच्या मदतीसाठी ही हेलिकॉप्टर रॉयल हवाई दलाने पाठविली होती.