ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी मलेरियावर अभिनव अशी प्रभावी लस शोधून काढली असून, डासांमुळे होणाऱ्या या रोगावर तो प्रभावी उपाय ठरणार आहे. वैद्यकीय चाचण्यात या लसीने चांगले परिणाम दाखवले असून मलेरियापासून रुग्णांचे संरक्षण केले आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या जेन्नर इन्स्टिटय़ूटचे प्राध्यापक अ‍ॅड्रियन हील यांच्या नेतृत्वाखाली या लसीच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्या वेळी औकायरो या जैवतंत्रज्ञान कंपनीचे सहकारीही उपस्थित होते.
काही प्रौढ स्वयंसेवकांना ही लस देण्यात आली असता त्यांचे मलेरियापासून पूर्णपणे संरक्षण झाले असे प्राथमिक चाचण्यांत दिसून आले आहे. मलेरियावर लसीच्या माध्यमातून सुरक्षात्मक परिणाम दाखवण्यात प्रथमच यश मिळाले असून सीडी ८ प्रकारच्या टी पेशींचा चांगला प्रतिसाद या लसीला मिळाला. मलेरियापासून शरीराचे संरक्षण करण्यात सीडी ८ या प्रतिकारशक्ती पेशी महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. उंदरांवरील प्रयोगातही या लसीचा चांगला परिणाम दिसून आला आहे.
सध्या प्रचलित असलेल्या बहुतेक लसी या प्रतिपिंड तयार करतात, पण शरीराच्या प्रतिकारशक्ती प्रणालीची दोन अंगे असतात. त्यात प्रतिपिंडे व टी पेशी यांचा समावेश असतो. या लसीमुळे टी पेशी जोमाने मलेरियाच्या जंतूंना प्रतिकार करतात. सीडी ८ टी पेशी या महत्त्वाच्या आहेत, कारण त्याच जंतूंचा पहिल्या फळीतील सैन्याप्रमाणे सामना करीत असतात. या पेशी सर्व संसर्गित पेशींवर हल्ला करू शकतात. जर्नल नेचर कम्युनिकेशन्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
नेमका प्रयोग काय?
या प्रयोगात यकृत पेशीवर मलेरियाच्या परोपजीवी जंतूने हल्ला केलेला होता, पण प्राथमिक प्रयोगानुसार सीडी ८ पेशींचा प्रतिसाद मिळवून इतर रोगांशी सामना करणेही शक्य आहे. या प्रयोगात सीडी आठ प्लस या पेशी यकृतातील मलेरियाच्या परोपजीवी जंतूवर सोडण्यात आल्या, असे हिल यांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांत ३६ लोकांवर प्रयोग करण्यात आले. त्यांच्यातील १४ प्रौढ हे आरोग्यवान होते. त्यांना विषाणुधिष्ठित लसी आठ आठवडय़ांच्या कालांतराने देण्यात आल्या असता जे १४ जण निरोगी होते त्यांच्यातील तिघांचे मलेरियाचे डासांनी चावल्यानंतर रक्षण झाले.
 इतर पाच जणांमध्ये मलेरियाची लक्षणे विलंबाने दिसली. एकूण मलेरियाचे ९० टक्के जंतू मारण्यात यश आले होते. यात वापरलेल्या सीडी ८ पेशींचा प्रतिसाद बघता पेशींची प्रतिकारशक्ती प्रणाली चांगलीच वाढलेली दिसली. इतर दहा स्वयंसेवकांना वेगळय़ा लसी देण्यात आल्या होत्या, पण त्यांना मलेरियापासून संरक्षण मिळाले नाही.

Story img Loader