व्हर्टिकल फार्मिग व एरोपॉनिक्स तंत्राचे संशोधन
वाढती लोकसंख्या, हवामानातील बदलांमुळे पिकांची होणारी हानी, तोटय़ातील शेती, या पाश्र्वभूमीवर शेतीच्या काही नवीन पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे. मातीशिवाय हवेत पिके वाढवता येतात, त्याला एरोपॉनिक्स म्हणतात. पाण्यात वाढवलेल्या पिकांना हायड्रोपॉनिक्स तंत्र म्हणतात. आता व्हर्टिकल फार्मिग (उध्र्वशेती) व एरोपॉनिक्स (वायूशेती) ही दोन नवी कृषी तंत्रे पुढील पिढय़ांसाठी उपयोगी आहेत.
मूळचे बेळगावीचे असलेले, पण मुंबईत वास्तव्यास असलेले मोहन बाजीकर हे कृषीतंत्रज्ञानातील भविष्यवेधी असलेल्या व्हर्टिकल फार्मिग असोसिएशनचे संस्थापक असून त्यांनी ऊध्र्वशेतीला व हवेच्या आधारे केल्या जाणाऱ्या शेतीवर संशोधन व विकास या स्वरूपाचे काम केले आहे. बांधकाम व्यावसायिक, स्थावर मालमत्ता व्यावसायिक, अन्न उद्योग, हरितगृह मालक, उद्योगपती व बँकर्स यांना या तंत्रांचे महत्त्व त्यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न चालवला आहे,. कारण त्यांचे सहकार्य यात आवश्यक आहे. ऊध्र्वशेती व हवेवर आधारित शेती यात इमारतींमध्ये कृत्रिम प्रकाश व अगदी थोडे पाणी वापरून ही पिके घेतली जातात. ऊध्र्वशेती ही बहुस्तरीय असते व त्याला व्यावसायिक शेतीही म्हटले जाते. त्यात हवामानाचा परिणाम होत नाही , कीटक व पिकांचे रोग यांच्याशी संबंध येत नाही. ऊध्र्वशेतीमध्ये पिकांचा पौष्टिकपणाही जपला जातो. एक एकर जमिनीवर शेतकरी जेवढे पीक घेतात तेवढे एका छोटय़ाशा खोलीत घेता येते, असा बाजीकर यांचा दावा आहे. एरोपॉनिक्स म्हणजे हवेवरील शेतीत मातीचा वापर केला जात नाही. पिके हवेत वाढवता येतात. या तंत्रज्ञानात पिकांसाठी ऑक्सिजनेशनचा वापर केला जातो. यामुळे इतर कृषी तंत्रांपेक्षा जैवभार उत्पादनाचे वजन ८० टक्के वाढते. हवेतील बाष्पामुळे पिके मूळ धरतात व चांगली वाढतात.
या दोन्ही तंत्रज्ञानात पिके बाह्य़ हवामानावर अवलंबून नसतात, त्यामुळे कुणावर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. टोमॅटोसारखी पिके वर्षांतून बारावेळा घेता येतात. जेव्हा शेतकरी नैसर्गिक दुष्काळ, पूर, मातीचा कस कमी होणे या समस्यांशी झगडत आहेत त्या परिस्थितीत एरोपॉनिक्स व व्हर्टिकल फार्मिग ही दोन्ही तंत्रे वरदान आहेत, असे मोहन बाजीकर यांनी सांगितले. ते धारवाडच्या कृषी विज्ञान विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असून त्यांनी त्या विद्यापीठाशी या कृषी तंत्रज्ञानाबाबत समझोता करारही केला आहे.

Story img Loader