भाजपचे नरेंद्र मोदी की काँग्रेसचे राहुल गांधी यांवरून आगामी लोकसभा निवडणुकीनंतरच्या निकालांची चित्रे रंगवली जात असतानाच दक्षिणेकडे जयललिता यांचा अण्णाद्रमुक पक्ष आणि भाकप यांनी लोकसभेसाठी युती केल्याचे जाहीर करून तिसऱ्या आघाडीची चुणूक दाखवली. तर, दुसरीकडे  आपण ‘तिसऱ्या आघाडी’च्या उभारणीसाठी प्रयत्नशील असल्याचे सांगत संयुक्त जनता दलाने तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू केली आहे.
नरेंद्र मोदी यांचे नाव पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निश्चित झाल्यावर भाजपशी काडीमोड घेणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी तिसऱ्या आघाडीची मोट बांधण्याकरिता पुढाकार घेतला आहे. संसद अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच येत्या ५ तारखेला नवी दिल्लीत भाजप आणि काँग्रेसेतर पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलाविण्यात आली आहे. मुलायमसिंग यादव, नितीशकुमार, जयललिता, नवीन पटनायक, देवेगौडा यांच्यासह डावे पक्ष यांनी एकत्र येण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. गेल्या ऑक्टोबर महिन्यात डाव्या पक्षांच्या पुढाकाराने नवी दिल्लीत झालेल्या मेळाव्यानंतर सर्व नेत्यांना एकत्र आणण्याचा हा दुसरा प्रयत्न असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही यात सामील करण्याच्या हालचाली सुरू आहेत. आंध्रचे जगनमोहन रेड्डी यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे.
दुसरीकडे, तामिळनाडूमध्ये अण्णाद्रमुक व भाकपने युतीची घोषणा रविवारी केली. या युतीत माकपला समाविष्ट करून घेण्यासाठी सोमवारी मार्क्‍सवादी नेते प्रकाश करात यांची भेट घेतली जाणार आहे.
*१९७७ मध्ये जनता पक्षाचा प्रयोग झाला. १९८९ मध्ये व्ही. पी. सिंग यांच्या नेतृत्वाखाली सारे पक्ष एकत्र आले होते. १९९६ मध्ये देवेगौडा आणि गुजराल यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्या आघाडीची सत्ता आली होती. हाच प्रयोग पुन्हा यशस्वी होऊ शकतो, असे जनता दल (यु) चे नेते शरद यादव यांनी म्हटले.
*काँग्रेस आणि भाजपच्या विरोधातील पक्षांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेतलेल्या नितीशकुमार यांनी, ५ तारखेला होणाऱ्या बैठकीत नवा पर्याय पुढे येईल, असा दावा केला. या आघाडीला तिसरी आघाडी संबोधण्यास नकार देत नितीशकुमार यांनी, हा वेगळा गट असेल, असे संकेत दिले.
*भाजप आणि काँग्रेसच्या विरोधातील १० समविचारी पक्ष एकत्र येऊन वेगळा पर्याय देतील, असे मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी म्हटले आहे.

Story img Loader