नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या तीन भाषा सक्तीच्या धोरणाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शुक्रवारी अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला. मातृभाषेला प्राधान्य दिले पाहिजे, जिथे आपण राहतो तिथली प्रादेशिक भाषा तसेच, नोकरी-उद्याोगासाठी गरजेची इंग्रजी भाषा अशा तीन भाषा लोकांना बोलता आल्या पाहिजेत, अशी भूमिका संघाने घेतली आहे.

काही दिवसांपूर्वी, मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी बोलता आलेच पाहिजे असे नव्हे, असे विधान संघाचे नेते भय्याजी जोशी यांनी केल्यामुळे वाद निर्माण झाला होता. संघाच्या प्रतिनिधी सभेच्या तीन दिवसांच्या बैठकीला बंगळूरुमध्ये सुरुवात झाली. या बैठकीच्या आधी झालेल्या पत्रकार परिषदेत सह-सरकार्यवाह सी. आर. मुकुंद यांनी, उत्तरेतील हिंदी भाषकांनीही दक्षिणेतील तमिळ वा अन्य एखादी भाषा शिकली पाहिजे, असे मत व्यक्त केले. दैनंदिन व्यवहारांसाठी मातृभाषेचा वापर केला पाहिजे. संघाने तीन वा दोन भाषांच्या सक्तीसंदर्भात ठराव केलेला नाही. पण, मातृभाषेला प्राधान्य देण्याचा ठराव केला आहे, असे मुकुंद म्हणाले.

जिथे राहतो तिथल्या लोकांशी संवाद साधण्यासाठी प्रादेशिक भाषा बोलता येणे गरजेचे आहे. संघाने भाषेसंदर्भातील भूमिका स्पष्ट केली असली तरी, प्रतिनिधी सभेत अधिकृतपणे ठराव संमत होण्याची शक्यता नाही.

तमिळनाडूमध्ये भाषेच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार व राज्यातील सत्ताधारी द्रमुक यांच्यातील वाद तीव्र झाला आहे. प्रादेशिक भाषा बोलता आली पाहिजे असे असले तरी, रुपयाचे चलनचिन्ह स्थानिक भाषेत बदलणे वगैरे भाषेसंदर्भातील अनेक मुद्दे राजकीय आहेत, असे मुकुंद म्हणाले.

संघाच्या तीन दिवसांच्या बैठकीमध्ये मणिपूरच्या हिंसाचार व सामाजिक परिस्थितीवर चर्चा केली जाणार असून त्यासंदर्भात ठरावही संमत केला जाणार आहे. मणिपूरमधील मैतेई व कुकी या दोन्ही समाजांतील संघाचे नेते-कार्यकर्ते लोकांशी चर्चा करून समन्वय साधत आहेत. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली असून प्रशासकीय परिस्थितीमध्ये सुधारणा झाली आहे, असे मत मुकुंद यांनी व्यक्त केले.

वर्षभरात दहा हजार शाखा वाढल्या

देशभरात संघाच्या ८३ हजार १२९ शाखा कार्यरत असून गेल्या वर्षभरात १० हजार शाखांची भर पडली आहे. १४ ते २५ वर्षे वयोगटातील तरुण संघाशी अधिक जोडले जात आहेत. गेल्या वर्षी संघाशी जोडल्या गेलेल्या दोन लाखांहून अधिक स्वयंसेवकांमध्ये १ लाख ६३ हजार स्वयंसेवक १४ ते २५ वयोगटातील असल्याची माहिती मुकंद यांनी दिली.